रॉबर्ट वडरा यांच्या व्यवहारातील कागदपत्रे गहाळ

December 19, 2014 4:09 PM0 commentsViews:

robertvadhera --621x414

19 डिसेंबर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरा यांच्या हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. हरियाणात काँग्रेस सरकार असताना व्रॉबर्ट वडरा आणि डीएलएफ यांच्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणाशी संबंधित फाईलचे 2 कागद गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. खुद्द हरियाणा सरकारने याबाबत पुष्टी केली आहे.

हरियाणातले आयएएस ऑफिसर अशोक खेमका यांनी आरटीआय अंतर्गत या गैरव्यवहारासंबधी फाईलची कॉपी मागवली होती. तेव्हा ही बाब उघड झाली. खेमका यांनी वडरा आणि डीएलएफ यांच्यादरम्यानचे हे जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यांना तसे आदेश देण्याचे अधिकार आहेत का याचा तपास करण्यासाठी हरियाणातल्या काँग्रेस सरकारनं एक समिती नेमली होती. खेमका यांनी मागवलेली फाईल याच समितीशी संबंधित आहे. या समितीनं नंतर वडरा आणि डीएलएफ यांच्यादरम्यानचे व्यवहार कायदेशीर ठरवून खेमका यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवला होता.

राज्याचे मुख्य सचिव पी.के.गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमका यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत वडरांच्या जमीन व्यवहार प्रकरणाच्या माहितीची मागणी केली होती. त्यानुसार खेमका यांना कागदपत्रे उपलब्धही करून देण्यात आली परंतु, त्यातील काही पाने गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. गहाळ झालेली पाने तातडीने शोधण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर कठोर कारवाई करू, असेही गुप्ता म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close