फिल्म रिव्ह्यु : पोटतिडकीने काही सांगू पाहतोय ‘पीके’

December 19, 2014 7:18 PM0 commentsViews:

अमोल परचुरे,समीक्षक_______

आमिर खानचा सिनेमा म्हटला की, आधीपासूनच चर्चा असते, उत्सुकता असते आणि ‘पीके’च्या बाबतीत तर दिग्दर्शक आहे राजकुमार हिरानी…त्यामुळे ‘पीके’बद्दल सर्व स्तरातील प्रेक्षकांमध्ये डबल उत्सुकता आहे. आमिर खान आणि राजकुमार हिरानी या जोडीमुळे जेवढ्या अपेक्षा घेऊन आपण थिएटरमध्ये जातो, त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे खरं असलं तरी अपेक्षाभंग होत नाही हे महत्त्वाचं…’पीके’ हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे, आणि एक अशी कलाकृती आहे जी तयार होणं आता हळूहळू बंद होत चाललंय.

pk15-oct23‘विकी डोनर’, ‘क्वीन’ अशा सिनेमांमधून आशेचा किरण दिसत राहतो, पण जास्तीत जास्त सिनेमे बनतात ते पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून…प्रेक्षकांना आवडतं म्हणून हवेतली मारधाड आणि अनेक विनाकारण गोष्टींचा मारा मनोरंजनाच्या नावाखाली होत असतो. सिनेमा हे मनोरंजनाचं साधन जरी असलं तरी याच माध्यमाचा समाजजागृतीसाठीही वापर करता येऊ शकतो हे राजकुमार हिरानीने ‘पीके’मधून दाखवून दिलंय.

काय आहे स्टोरी ?

pk01-oct23पीके बघताना आपण मनापासून हसतो, त्यातल्या विनोदाला मनापासून दाद देतो, पण हळूहळू पीके विचार करायला लावतो…संदेश तर द्यायचाय पण उगाच समाजात जागृती आणणं हा लेखक-दिग्दर्शकाचा आविर्भाव नाही, त्यांनी सरळसोप्या रंजक गोष्टीमधून भारतीय समाजावर सणसणीत कोरडे ओढलेले आहेत. आपल्या समाजात असलेल्या विसंगती, श्रद्धा-अंधश्रद्धा, दहशतवादाचं भूत, कडवं धर्मप्रेम, स्त्री-पुरुष संबंध अशा सगळ्याच गोष्टींचा एक्स-रे काढून आपल्यासमोर ठेवतो. प्रेक्षकांना लेक्चर दिलेलं आवडणार नाही, म्हणून पीकेच्या माध्यमातून, त्याच्या निरागसतेमधून प्रश्न विचारत राहतो. भाबड्या पीकेच्या प्रश्नांनी किंवा करामतींनी आपण खदखदून हसतो, पण थोड्यावेळाने आपण आपल्यावरच हसतोय याचं भान यायला लागतं. राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांच्या लिखाणातला भानावर आणणारा ‘ब्रिलियंस’ खरंच खूप ग्रेट वाटायला लागतो आणि पीकेच्या टीमला नकळत सलाम करुन टाकतो.

नवीन काय ?

pk03-oct23पीके चा विषय, त्यातला आशय, त्याची मांडणी या सगळ्यावर राजकुमार हिरानी आणि टीमनं बराच काळ आणि बरीच मेहनत घेतलेली आहे हे नक्कीच जाणवतं, पण इंटरव्हलनंतर स्क्रीनप्ले संथ होऊन जातो. टिपिकल बॉलिवूड लव्हट्रॅक आल्यामुळे फोकस शिफ्ट होतो, सुदैवाने थोड्यावेळात सिनेमा ट्रॅकवर येतो पण तरीही प्रेमाची लांबण टाळता आली नसती का असा प्रश्न राहतोच. ‘लगे रहो मुन्नाभाई’ असो किंवा ‘थ्री ईडियट्स’, एखाद्या विषयाची किंवा समस्येची तीव्रता संपूर्ण समाजाला कशी भिडतेय हे दाखवण्यात राजकुमार हिरानीचा हातखंडा आहे. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये बापू कसे प्रश्न सोडवतात हे वेगवेगळ्या उदाहरणातून दाखवलं होतं. पीकेमध्ये या सार्वत्रिक परिणामाचीही उणीव जाणवते. क्लायमॅक्समध्ये संघर्ष वैयक्तिक पातळीवर उरतो, पण तरीही आपल्याला जे सांगायचंय ते प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा ठामपणा ठसठशीतपणे जाणवत राहतो. सरळमार्गाने नाही पण थोडी वाट वाकडी करुन जो मेसेज पोचवला जातो त्यावरच विचार करत आपण थिएटरमधून बाहेर पडत असतो.

परफॉर्मन्स

pk13-oct23मोठा हिंदी सिनेमा असल्यामुळे जी तांत्रिक श्रीमंती अपेक्षित असते ती पीकेमध्ये आहेच, पण त्याचबरोबरीने कॉश्च्युम्सवर बराच विचार केलेला जाणवतो. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राचं कामही कठीण होतं कारण छोट्या छोट्या भूमिकांसाठी चांगले अभिनेते निवडणं आव्हानात्मक असणार. मुख्य कलाकारांमध्ये संजय दत्तची निवड ओढूनताणून केल्यासारखी वाटते. लकी चार्म वगैरे कारणांमुळे संजूबाबा सिनेमात आहे असं वाटतं, त्याच्या जागी दुसरा कुणीही चालू शकला असता, पण बाकी सर्व कलाकारांची कामं सुंदरच झालेली आहेत. अनुष्का शर्माचे ओठ सर्जरीनंतर विचित्र दिसत असले तरी तिचा अभिनय चांगला आहे. ‘जॉली LLB’ नंतर तेवढाच तगडा अभिनय केलाय सौरभ शुक्लाने…आणि बाकी अख्खा सिनेमाभर भरुन राहिलाय आमिर खान. आमिर खानचा हा आत्तापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स म्हणावा लागेल. कुठेही लाऊड होणार नाही किंवा भाबडेपणा हा कुठेही बावळटपणा वाटणार नाही याची काळजी घेत अतिशय मेहनतीने आमिरने पीके साकारलाय. भूमिकेचा बॅलन्स साधल्यामुळे राजकुमार हिरानीचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत अचूक पोचवण्यात आमिरची ही कामगिरी महत्त्वाची ठरते.

जाता-जाता…

pk12-oct23पेशावरमध्ये नुकतंच झालेलं हत्याकांड किंवा आपल्या देशात कडव्या धर्मवादानं गढूळ झालेलं समाजमन या सगळ्या वातावरणात पीके जखमांवर फुंकर घालण्याचं काम नक्कीच करतो. पीकेकडे उत्तरं नाहीत पण त्याचे प्रश्न अनुत्तरीत करणारे आहेत…तसंच या सिनेमाचं आहे. सिनेमात समस्यांवर उत्तरं दिलेली नाहीत, उलट या समस्यांबद्दल प्रेक्षकाला जागरुक करण्याचं काम केलेलं आहे, आणि म्हणूनच त्यातील त्रुटींकडे डोळेझाक करुन पीके बघायलाच हवा असा आहे…

रेटिंग 100 पैकी 80
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close