जातपंचायतीची दादागिरी, दाद मागणार्‍या कुटुंबाला अमानुष मारहाण

December 20, 2014 2:15 PM0 commentsViews:

baramati3420 डिसेंबर : बारामतीतील वैदू समाजात पुन्हा एकदा जात पंचायतीचा अमानुषपणा उघड झालाय. जातीत सामावून घेण्याची मागणी करणार्‍या आठ जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात आठ जण जखमी झालेत, यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. बारामती शहरालगतच्या झागरवाडी वैदू लोकवस्तीतली ही घटना आहे.

बारामती शहरालगत असलेल्या डोर्लेवाडी, झारगडवाडीत वैदू समाजाची मोठी लोकवस्ती आहे. या ठिकाणी परंपरेनुसार वैदू समाजातील लोकांच्या प्रश्नावर जात पंचायतीमध्ये न्यायनिवाडा केला जातो. त्यानुसार इथल्या हनुमंत शिंदे या कुटूंबाला दीड वर्षापूर्वी वाळीत टाकण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही जातीतल्या लग्नाला आणि धार्मिक विधी येण्यासाठी मज्जाव जात पंचायतीने केला होता. मात्र शिंदे कुटुंबियांनी पुन्हा जातीत येण्यासाठी जात पंचायतीकडे वारंवार विनंती केली होती. शिंदे कुटुंबाला पुन्हा जातीत येण्यासाठी जात पंचायतीच्या पंचानी पाच लाखाची मागणी केली होती. मात्र शिंदे कुटुंब हे पैसे देण्यास तयार नव्हते. याबाबत शिंदे कुटुंबानी गावातील इतर ग्रामस्थाना मध्यस्थी करण्यासाठी साकडं घातलं होतं. त्यानुसार आज झारगाडवाडीत ग्रामस्थ आणि जात पंचायतीचे पंच यांची एक बैठक झाली . त्यामध्ये देखील वादा-वादी झाली. मात्र काही वेळानी तोडगा निघत नसल्याने सर्वजण आप-आपल्या घरी गेले होते. मात्र जात पंचायतीचे पंच असताना तुम्ही गावकर्‍यांना का बोलाविलं. असं म्हणत शिंदे कुटुंबीयांवर जात पंचायतीच्या पंचानी हल्ला केला.

या मारहाणीत पंचानी महिलांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आहे. विशेष म्हणजे वैदू समाजाची भांडणे सोडविण्यास गेलेल्या गावातील ग्रामस्थानाही मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील मंगेश मासाळ याच्या डोक्याला गंभीर इजा झालीय. त्यामुळं त्याच्यावर बारामतीच्या देवकाते हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन सारखे अनेक कायदे अस्थित्वात आले, मात्र मागासलेल्या समाजामध्ये त्याची जागृती होत नसल्याने या कायद्यांचं धाक राहिलेला नाही. त्यामुळेच राज्याच्या अनेक भागात जातपंचायतीचा प्रभाव दिसून येतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close