निसर्गसंपन्न चांदोली अभयारण्याला मिळणार नवसंजीवनी

December 22, 2014 9:04 AM0 commentsViews:

आसिफ मुरसल, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली

22 डिसेंबर :   सह्याद्री आणि पश्चिम घाटाच्या कुशीत लपलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे पर्यटक आणि अभ्यासकांसाठी उत्कृष्ट ठिकाण. हिरवागार निसर्ग, चांदोली धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ही इथली वैशिष्ट्ये. मात्र, अपुर्‍या सोयीसुविधांमुळे हे ठिकाण दुर्लक्षितच राहिलं आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी महाबळेश्वरच्या धर्तीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विकास व्हावा असा प्रस्ताव सांगलीचे जिल्हाधिकारी शासनाकडे पाठवणार आहेत.

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीच्या सीमेवर मन मोहून टाकणारा हा राष्ट्रीय उद्यानाचा नजारा आहे. एका बाजूला कोयना आणि दुसर्‍या बाजूला राधानगरी यामुळे चांदोलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकी नैसर्गिक संपत्ती असूनही याचा पर्यटन आणि अभ्यासासाठी फारसा प्रसार झालाच नाही. त्यामुळे याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत.

chandoli 1

चांदोलीपर्यंत येण्यासाठी पर्यटकांना दुपार किंवा कधी कधी संध्याकाळ होते. इथे राहण्या- खाण्याची काहीच सोय नाही. इथे पर्यटनासाठी कितीतरी आकर्षक ठिकाणं आहेत. ती पाहण्यासाठी किमान 2 दिवस लागतात. अभ्यासक आणि निसर्गप्रेमींना तर आणखी जास्त काळ राहावं लागतं. आता पर्यटकांना राहण्याची, खाण्याची सोय, बोटिंग, जंगलात फिरण्यासाठी वाहनांची सोय आणि इतर सोयी सुविधा सुरू केल्या जाणारा आहेत. पर्यटनाचा विकास झाला तर त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.

चांदोली हे राज्यातलं सहावं राष्ट्रीय उद्यान आहे. 318 चौरस किलोमीटर इतका त्याचा विस्तार आहे. प्राण्यांच्या निरनिराळ्या प्रजाती, कास पठाराप्रमाणे झोळंबीचे फुलांचे पठार, वन औषधी, अनेक ऐतिहासिक स्थळं, ही इथली खास वैशिष्ट्ये आहेतय चांदोली अभयारण्याला दररोज 50 ते 100 पर्यटक भेट देतात. सध्या सुरक्षित भाग सोडून या जंगल परिसरात जंगल सफारी करण्याची सोय नाही. विकासाचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर पर्यटकांना जंगलात आणखी आतमध्ये जाता येणार आहे. त्यामुळेच आता इथे येणार्‍या जंगलप्रेमींचं, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close