अखेर काँग्रेसच्या पाचही आमदारांचं निलंबन मागे

December 23, 2014 8:39 PM0 commentsViews:

congress_mla23 डिसेंबर : राज्यपाल धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत काँग्रेस आमदारांचं निलंबन मागे घेत असल्याची घोषणा केली.

भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप, अब्दुल सत्तार, राहुल बोंद्रे, अमर काळे आणि जयकुमार गोरे या आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची गाडी विधानभवनाच्या आवारात अडवली होती. यावेळी या पाचही आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केली आणि त्याचे व्हिडिओ फुटेज आपल्याकडे असलाचा खुलासा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसे यांनी विधानसभेत याबद्दल प्रस्ताव मांडला. त्यानंतर या पाचही आमदारांवर वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. अखेर आज हिवाळी अधिवेशनात या पाचही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलंय. या पाचही काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत मांडला आणि निलंबन रद्द झाल्याची घोषणाही केली. या आमदारांचं निलंबन मागे घेतलं असलं तरी राज्यपाल धक्काबुक्की प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या अधिवेशनात मांडला जाणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close