वाजपेयी यांच्या कारकीर्दीवर एक दृष्टीक्षेप

December 24, 2014 4:27 PM0 commentsViews:

atal_bihari_vajpayee24 डिसेंबर : मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर झालाय. ‘भारतरत्न’च्या रुपाने अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाची ही खास भेट मिळालीये. वाजपेयींच्या रुपानं पहिल्यांदाच एखाद्या भाजप नेत्याचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव झालाय. भाजप सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न पुरस्कार जाहीर व्हावा यासाठी हालचाल सुरू झाली होती. अखेरीस आज यावर शिक्कामोर्तब झालंय. वाजपेयी यांच्या कारकीर्दीचा हा आढावा…

एक खंबीर आणि अनेकांना आदर्श असणारा नेता…निवृत्ती हा शब्द ज्याच्या शब्दकोषात कधीही नव्हता असा नेता…1924 साली ख्रिसमसच्या मुहुर्तावर अटलबिहारींचा जन्म झाला. कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यार्थी शाखेतून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. पण त्यांची खरी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती 1951 मध्ये भारतीय जनसंघातून..ज्याचे ते संस्थापक सदस्य होते. 1975 साली आणीबाणीच्या वेळी वाजपेयींना अटक झाली. जनता दलाचं सरकार कोसळलं..आणि त्यानंतरच्या काळात वाजपेयींचा उदय झाला तो एक वरिष्ठ राजकीय नेता म्हणून..1980 साली भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळी वाजपेयींचा सिंहाचा वाटा….त्यापुढच्या 15 वर्षांत भाजपच्या लोकसभेतील जागा 2 वरून 200 वर गेल्या त्याचं कारण वाजपेयी…1992 चा रामजन्मभूमी वाद हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला एक वादग्रस्त टप्पा..बाबरी मशीद प्रकरणावर रस्त्या रस्त्यावर दंगली उसळल्या…त्या काळात वाजपेयींच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली. तरीही 1996 मध्ये भाजपचं सरकार आलं. वाजपेयींचं स्वप्न साकार झालं. पण पंतप्रधानपदाचा हा मुकूट फार काळ टिकला नाही. अवघ्या 13 दिवसांत वाजपेयींना पायउतार व्हावं लागलं. पण ही आपली हार नसल्याचं वाजपेयी सतत सांगत राहिले. “आम्ही सत्तेपासून दूर झालो असू पण आमच्या कर्तव्यापासून नाही….देशाला आघाडीवर नेण्याचं आमच्या कर्तव्याचं पालन आम्ही नेहमीच करत राहू…”

1998 मध्ये एका नव्या ताकदीनिशी भाजप पुन्हा सत्तेवर आला आणि वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. पोखरणमध्ये अणुचाचणी करण्याचा निर्णय वाजपेयींनी घेतला.. तो यशस्वी झाला आणि वाजपेयींची लोकप्रियता शिखरावर पोहचली. त्याच्या पुढल्याच वर्षी त्यांनी वाघा सीमेवर भारत पाकिस्तान बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असा निर्णय घेणारे ते पहिले पंतप्रधान. पण, सगळं व्यवस्थित चालत असतानाच भाजपच्या मित्रपक्षात कुरबुरी सुरू झाल्या आणि एनडीएत फूट पडली. पण तरीही कारगील युद्ध यशस्वीपणे हाताळणार्‍या वाजपेयींचं स्थान देशवासियांच्या मनात नेहमी आदराचं राहिलं.

1999 च्या ऑक्टोबरमध्ये वाजपेयी तिसर्‍यांदा पंतप्रधान बनले. यावेळी मात्र त्यांनी पंतप्रधानपदाचा आपला कार्यकाल पूर्ण केला. संसदेवरचा हल्ला हा त्यांच्या पंतप्रधान म्हणून कारकीर्दीवरचा एक डाग..पण त्याचबरोबर 2002 मधील गुजरात दंगल त्यांनी ज्याप्रकारे हाताळली, त्यावरूनही त्यांच्यावर बरीच टीका झाली. गोध्रामध्ये जे घडलं ते नक्कीच लाजिरवाणं होतं. पण गोध्रानंतर गुजरातमध्ये जे घडलं ते…

2004 मध्ये एनडीएनं इंडिया शायनिंग कॅम्पेन राबवलं. पण पुढे काही भाजपच्या मनाप्रमाणे घडलं नाही. 2004 च्या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. आणि त्या पराभवाबरोबरच वाजपेयी क्रियाशील राजकारणातून हळू-हळू अस्तंगत होऊ लागले. एका नव्या भूमिकेत ते शिरले, ही भूमिका होती मार्गदर्शकाची…अशा या मार्गदर्शकाची ही कारकीर्द…वादग्रस्त तरीही वेगळी..एक कवी मनाचा हा नेता भारताच्या सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक होता ही आठवण इतिहासात नक्कीच जपली जाईल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close