अमेरिकेच्या हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या बैतुल्लाह मसूद ठार

August 7, 2009 2:42 PM0 commentsViews: 2

7 ऑगस्टतालिबानचा नेता बैतुल्लाह मसूद मारला गेलाय. अशी बातमी पाकिस्तानी मीडियानं दिली आहे. अमेरिकी सैन्यानं वझिरिस्तान भागात केलेल्या हवाई हल्ल्यात बैतुल्लाह ठार झाला. या बातमीला तालिबाननंही दुजोरा दिलाय.अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा धुव्वा उडवल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तानचं लक्ष्य होतं जगातल्या दोन चेह-यांवर. ओसामा बिन लादेन आणि त्यानंतर बैतुल्लाह मसूद. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातल्या वजिरीस्तानमध्ये तेहरिक-ए-तालिबान मार्फत बैतुल्लाह मसूदनं आपलं बस्तान बसवलं. 2004 च्या दरम्यान एकीकडे अमेरिकी शांतीसेनेशी लढत असताना बैतुल्लानं पाकिस्तान सरकारशी संधान बांधलं. युद्धबंदीचा करारही केला. मसूद जमातीच्या टोळ्यांचा म्होरक्या आणि जगातला कडवा अतिरेकी म्हणून मसूदची ओळख जगाला झाली, ती बेनझीर भूत्तो यांच्या हत्येनंतर. बेनझीरच्या हत्येची जबाबदारी खुले आमपणे तेहरिक-ए-तालिबानने उचलली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अराजक माजलं. बैतुल्लाहने केलेल्या महत्वाच्या कारवाया अशा होत्या- सप्टेंबर 2007 रावळपिंडी स्फोट, 28 डिसेंबर 2007 बेनझीर भूत्तो यांची हत्या, मार्च 2009 लाहोर पोलीस ऍकेडमीवरचा हल्ला आणि एप्रिल 2009 न्यूयॉर्कमधील बिंगहॅम्प्टन गोळीबार प्रकरण. पाकिस्तानला हादरवून टाकणा-या अलिकडच्या घटनांमध्ये बैतुल्लाह मसूदच्या कारवाया कारणीभूत ठरल्या. अमेरिकी ड्रोन विमानांनी वजिरीस्तान भागात त्यानंतर सातत्यानं बैतुल्लाह मसूदचा काटा काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 2008 साली बैतुल्लाह मसूद मारला गेल्याची एक अफवा पसरली. पण ती अफवाच ठरली. पाच ऑगस्ट 2009 रोजी पुन्हा एकदा बैतुल्लाह मसूद मारला गेल्याची बातमी येऊन थडकली. अमेरिकी ड्रोन विमानांच्या हल्ल्यात बैतुल्लासह त्याची बायको, त्याच्या किडनीवर उपचार करणारा डॉक्टर आणि अंगरक्षक ठार झाला असल्याची ही खबर आहे. यावेळी मात्र तालिबानच्या कुठल्याही प्रवक्त्याने या बातमीचा इन्कार केलेला नाही. पाकिस्तानची वझिरीस्तानमधली डोकेदुखी काहीशी कमी झाली आहे. तर अतिरेक्यांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करणं अमेरिकेला आता शक्य होणार आहे.

close