पंतप्रधानांचं डबेवाल्यांना स्वच्छता अभियानाचं आमंत्रण

December 25, 2014 5:41 PM0 commentsViews:

pm_on_dabewala25 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (गुरूवारी) वाराणसी मतदारसंघात जाऊन ‘स्वच्छता मोहिमे’चा आढावा घेतला आहे. यावेळी मोदींनी आणखी 9 जणांना ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलंय. विशेष म्हणजे मोदींनी मुंबईच्या डबेवाल्यांचा उल्लेख करून त्यांनाही स्वच्छता अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलंय.

डबेवाल्यांसोबत सौरभ गांगुली, कपिल शर्मा, किरण बेदी, नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, नृत्यांगना सोनल मानसिंग, इनाडू गुप्रचे रामोजी राव, इंडिया टुडे ग्रुपचे अरुण पुरी या मान्यवरांना मोदींनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलंय.

दरम्यान, नरेंद्र मोदी आज दिवसभर वाराणसीच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने आज वाराणसीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी वाराणसीला पोहोचल्यानंतर मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दौर्‍याला सुरुवात केली. त्यानंतर मोदींनी वाराणसीच्या अस्सी घाटाची पाहणी देखील केली.

यावेळी बोलताना, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी देशात सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला आजवर उदंड प्रतिसाद मिळाल्याचं सांगत, अभियानाला हातभार लावणार्‍या सर्वांचे मोदींनी अभिनंदन केलं. तसंच वाजपेयींच्या जन्मदिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करताना पारदर्शक आणि स्वच्छ कारभार देणेही सरकारची जबाबदारी असल्याचं मत मोदींनी यावेळी व्यक्त केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close