फ्लॅशबॅक 2014 : आता उरल्या आठवणी…(भाग 2)

December 26, 2014 8:23 PM0 commentsViews:

आपल्या अभिनयसंपन्न कलागुणाने रसिकांना मनमुराद हसवणारा, आनंद देणारा तर कुठे खलनायकी भूमिका साकारून तेवढाच जरब दाखवणारा कलाकार…पडदा छोटा असो अथवा मोठा…हा कुठेही, कसाही कोणत्याही भूमिकेत असतो…माणसाच्या काल्पनिक आणि वास्तवाची दुनिया तुमच्या समोर मांडणारा हा कलाकार…सिनेमाच्या माध्यमातून तुम्हा-आम्हाला हसवणार्‍या अशा अनेक कलाकारांनी रिअल लाईफमध्ये मात्र रडवलं…सरत्या वर्षात सदाशिव अमरापूरकर, स्मिता तळवलकर, कुलदीप पवार, जोहरा सेहगल, देवेन वर्मा, तमाशासम्राट काळू-बाळू अशी ही कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेली…त्यांच्या आठवणींना हा उजाळा…

एक तमाशासम्राटांची जोडी….काळू-बाळू या जोडीनं तमाशामध्ये 70 ते 90 चं दशक गाजवणारे सुप्रसिद्ध तमाशा कलावंत अंकुश खाडे उर्फ बाळू...तमाशा सम्राट अंकुश खाडे उर्फ बाळू हे काळू-बाळूच्या जोडीतले एक कलाकार हे दोघे जुळे भाऊ…काळू यांचं नाव लहू असं होतं आणि 7 जुलै 2011 रोजी त्यांचं निधन झालं. जहरी प्याला, राजा हरिचंद्र, राम नाही राज्यात आणि सोंगाड्या ही त्यांची अतिशय गाजलेली वगनाट्यं..या वगनाट्यांमध्ये हे दोघंही प्रामुख्यानं सोंगाड्याची भूमिका करत..विशेष म्हणजे मराठी सिनेमातल्या सुवर्ण काळातही त्यांच्या वगनाट्याला भरगोस प्रतिसाद मिळायचा. ही जोडी अनेक यात्रा आणि जत्रांमध्ये खास आकर्षण ठरायची..फक्त राज्यातच नाही, पण मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही या नाटकांचे प्रयोग झाले. त्यांना मिळणारी प्रसिद्ध त्यांच्या सामाजिक जाणिवेच्या मध्ये कधी आली नाही. त्यांनी अनेक संस्थांसाठी विनामूल्य प्रयोग केले. काळू-बाळूंचं अडनाव खाडे असलं तरी कवलापूरकर म्हणून ते प्रसिद्ध होते. गंमत म्हणजे हे दोघं इतके सारखे दिसायचे की,प्रयोगांमध्ये काळू कोण आणि बाळू कोण हे ओळखण्यासाठी पैज लावली जायची. त्यांचं वागणं-बोलणंही अगदी सारखं होतं.तमाशाचा इतिहास हा काळू-बाळूंवर अनेक पानं लिहिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

खल’नायक’… रंगभूमी ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ आणि चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं वयाच्या64 व्या वर्षी निधन झालं. …सदाशिव अमरापूरकर यांनी जवळपास 50 व्यावसायिक नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. 1971 ते 1979 सलग 8 वर्षं त्यांनी रंगभूमीवर 50हून अधिक नाटकांत अभिनय केला आणि काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. 1979ला त्यांच्या कारकीर्दीला वळण देणारी भूमिका त्यांना मिळाली. त्यांनी 22 जून 1897न या सिनेमात रंगवलेली बाळ गंगाधर टिळकांची भूमिका प्रचंड गाजली आणि इथूनच त्यांचा रंगभूमीवरून मोठ्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. अर्धसत्य सिनेमातील त्यांची खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली, त्यासाठी त्यांना आपला पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. तसंच ‘सडक’मध्ये त्यांनी साकारलेली महारानी अतिशय गाजली. अमरापूरकरांचे संवादफेक आणि खलनायकांच्या भूमिकांमधील वैविध्य प्रेक्षकांना अतिशय भावली. सदाशिव अमरापूरकरांनी खलनायक रंगवले तसे काही विनोदी भूमिकाही तितक्याच सफाईपणे सादर केल्या. आंखें, इश्क, कुली नंबर वन, आँटी नंबर वन, जयहिंद यातील भूमिकाही लक्षात राहिल्या. 250 हून अधिक सिनेमांमध्ये अमरापूरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. कलाविश्वात रमणारा हा माणूस सामाजिक कार्यात धडाडीने सहभागी होता.

‘महाभारत पर्वाचा’ दिग्दर्शक…महाभारत या लोकप्रिय मालिकेचे निर्माते आणि दि बर्निंग ट्रेन, बागबाग, बाबूल,या सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते रवी चोप्रा यांनाही आपण मुकलो. रवी चोप्रा यांनी बी.आर. फिल्म्सच्या माध्यमातून जमीर, द बर्निंग ट्रेन, मजदूर, दहलीज, बागबान, बाबूल या सिनेमांची निमच्ती केली. मल्टिस्टारर रद बर्निंग ट्रेनन हा सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या जोडीला घेऊन निर्माण केलेल्या बागबान या सिनेमानंही मोठी प्रशंसा मिळवली. पण रवी चोप्रा यांचं नाव खर्‍या अर्थानं घरोघरी पोहोचलं ते महाभारत या मेगासिरीयलमुळे..1988 ते 90 या कालावधीत दूरदर्शनवर ही सिरीयल सुरू होती. भारतीय प्रेक्षकांवर या सिरीयलनं अक्षरशः गारुड घातलं होतं.

बॉलीवूडची दादी पडद्याआड….एक जिंदादिल अभिनेत्री म्हणून ओळख असणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल…वयाच्या 102 व्या वर्षा जगाचा निरोप घेतला..चिनी कम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल से, बेंड इट लाईक बेकहॅम या चित्रपटातली त्यांची कामं खूप गाजली. 1998 ला पद्मश्रीनं जोहरा सहगल यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याचबरोबर कालिदास सन्मान,संगीत अकादमी यासारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. 1935 मध्ये उदय शंकर यांच्या नृत्यपथकात नृत्यागंना म्हणून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ज्येष्ठ असल्या तरी जोहरा सेहगल यांनी आजच्या कलावंतांशी स्वत:ला जोडून घेतलं होतं.त्यामुळेच वीर झारा,सावरीया, हम दिल चुके सनम या चित्रपटात सगळ्या भूमिकांमध्ये त्यांची भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहिल्या.

एक कथ्थक नृत्यांगना…ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारादेवी...सितारादेवी यांचे बॉलिवूडशीही नाते होते. मदर इंडिया या चित्रपटात त्यांनी नृत्य केलं होतं. तसेच नगिना, रोटी आणि वतन या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शनही केलं होतं. सितारादेवी यांना त्यांच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. 1969 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 1995 मध्ये कालिदास सन्मानानं सितारादेवी यांना गौरविण्यात आलं होतं.

मराठी सिनेसृष्टीचे ‘स्मित’ हरपले…मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर… चौकट राजा, कळत नकळत, तू तिथे मी, सवत माझी लाडकी अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचं मुंबईत निधन झाले.

दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या स्मिता तळवलकर यांनी मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टेलिव्हिजनवरच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणूनही स्मिता तळवलकरांनी आपली ओळख निर्माण केली. जवळपास 17 वर्षं त्यांनी दूरदर्शनवर काम केलं. 1986 मध्ये त्यांनी गडबड घोटाळा आणितू सौभाग्यवती हो या चित्रपटांतून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1989 मध्ये त्यांनी अस्मिता चित्रर या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती- दिग्दर्शन केले. चौकट राजा, कळत नकळत, सवत माझी लाडकी,तू तिथे मी, सातच्या आत घरात हे चित्रपट तर अवंतिका, ऊनपाऊस, उंच माझा झोका, पेशवाई या मालिका विशेष गाजल्या. कळत नकळत या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

हरहुन्नरी अभिनेता कुलदीप पवार… विनोदी अभिनय, त्याच तोडीचा खलनायक आणि आकर्षक व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू कलाकाराने चटका लावणारी एक्झीट घेतली. कुलदीप पवार त्यांचा खलनायक जितका प्रभावी, तितकाच हिरो भारदस्त आवाज आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व याच जोरावर त्यांची भूमिका नेहमीच लक्षात राहायची. प्रभाकर पणशीकर यांना कुलदीप पवार यांच्यात संभाजी दिसला आणि इथे ओशाळला मृत्यू नाटकात त्यांना भूमिका मिळाली आणि मग मागे वळून पाहणे झालेच नाही. दरोडेखोरर, अरे संसार संसार, शापित, आईचा गोंधळ अशा अनेक सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, पती सगळे उचापती अशी नाटकंही त्यांनी केली. सिने आणि नाट्य सृष्टी गाजवतानाच छोट्या पडद्याची भुरळही त्यांना पडली.परमवीर,तू तू मै मै, या मालिकांतून पुन्हा एकदा ते घराघरांत पोचले. फू बाई फूच्या ग्रँड फिनालेमधला त्यांचा परफॉर्मन्स हा दुदैर्वानं शेवटचा ठरला.

हास्यकलाकाराने रडवलं…. आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांनी वयाच्या 78 वर्षी जगाचा निरोप घेतला. वर्मा यांनी हिंदी चित्रपटांत विनोदी भूमिका साकारल्यात. ‘अंगूर’ या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका विशेष गाजली. तसंच खट्टा मीठा, अंदाज अपना अपना या चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका निभावल्या.  ‘अंगूर’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘चोरी मेरा काम’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ठ हास्यकलाकार’ म्हणून तीन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close