देवाची मुरळी बनवून 13 वर्षांच्या मुलीवर लादलं मातृत्व!

December 27, 2014 2:23 PM0 commentsViews:

27 डिसेंबर  :  अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात अंधश्रद्धेतून देवाशी लग्न लावून मुरळी बनलेली 13 वर्षीय मुलगी माता बनल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला अडीच महिन्यांचे तान्हे बाळ आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. पीडितचे लैंगिक शोषण झालं असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

समाजात प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी दिले जात आहे. परंपरेनुसार एखाद्या महिलेला खंडोबाच्या कृपेने मुलबाळ झाले असेल तर पहिला मुलगा खंडोबाच्या सेवेत अर्पण केले जाते. खंडोबाला अर्पण करण्यात आलेल्या मुलाला वाघ्या म्हणले जाते तर मुलीला मुरळी म्हटले जाते. या मुरळी मुलींचं देवाशी लग्न लावून दिलं जातं. ही अंधश्रद्धा गेली कित्येक वर्ष राज्यात जोपासली गेली आहे. सरकारने 2005 साली यावर बंदी आणणारा कायदा केला, पण परिस्थिती काय फारशी बदलली नाही.

अकोले इथली ही 13 वर्षांची मुलगी अशाच प्रथेची बळी ठरली आहे. या पीडित मुलीच्या आजीने नवस फेडण्याच्या नावाखाली तिचे खंडोबा देवाशी विवाह लावून तिला मुरळी बनवून मंदिरात सोडून दिले होते. विशेष म्हणजे तेव्हा मुलगी अवघ्या दोन वर्षाची होती. तिला जागरण गोंधळाच्या फडात, वाघ्या गौतम पवार हा तुझा नवरा आहे, तुला त्याच्यासोबत लग्न करावं लागेल, असं सांगून तिला त्याच्या बायकोसारखं वागण्याची बळजबरी केली गेली. त्याच काळात तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले. आज वयाच्या 13 व्या वर्षात तिला एक अडीच महिन्याची मुलगी झाली आहे.

पीडित मुलीचे आई-वडील वीटभट्टीवर रोजंदारी करुन त्यांची उपजीविका करतात. या कष्टकरी कुटुंबाला पाच मुली आहेत. त्यामुळे पैशाच्या हव्यासापोटी या मुलीच्या आजीनेच तिला जागरण गोंधळाच्या फडात पाठवलं होतं. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या मुलीला पाचवेळा वेगवेगळ्या शाळेत पाठवून तिला शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही यश आलं नाही. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी उशिरा का होईना याची तक्रार दाखल करुन घेतली आणि आता याप्रकरणात त्या मुलीच्या आजीसह तिघांना अटक केली आहे.

कायदा असूनही अशा अनिष्ट प्रथांवर अजून आळा बसला नाही. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत प्रशासन कमी पडतो असं स्पष्टपणे दिसतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close