एअर एशियाच्या विमानासह 162 जणं बेपत्ता

December 28, 2014 7:39 PM0 commentsViews:

air_asia 23

28 डिसेंबर  : इंडोनेशियाहून सिंगापूरच्या दिशेने निघालेले एअर एशियाचे विमान रविवारी सकाळी उड्डाणानंतर अचानक बेपत्ता झाले आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह सुमारे 162 जणं प्रवास करत होते.

इंडोनेशियातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर एशियाचे QZ 8501 या विमानाने इंडोनेशियातील सुराबया शहरातून सिंगापूरला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणाच्या तासाभरानंतर विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान नियमित मार्गानेच सिंगापूरला जात होते असे जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी सांगितले. या विमानाशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या विमानात सुमारे 155 प्रवासी असल्याचे समजते. यात 149 प्रवासी हे इंडोनेशियाचे, 3 कोरियाचे, सिंगापूरचा, ब्रिटन आणि मलेशियाचा प्रत्येकी 1 प्रवासी या विमानाने प्रवास करत आहे. क्रू मेंबर्सपैकी विमानात 2 पायलट, 4 फ्लाइट अटेंडंट आणि 1 इंजिनियरही समावेश आहे. या वैमानिकालाही जवळपास 6 हजार तासांहून जास्त विमान उडवल्याचा अनुभव आहे.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात शोधमोहीमेत अडथळे येण्याची चिन्हे असल्याने इंडोनेशियाने शोधमोहीम थांबवली आहे. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीमेला सुरुवात करणार असल्याची सूत्रांची माहिती.

एअर एशियाचे प्रमुख टॉनी फर्नांडीस यांचे ट्विट

आम्ही आपातकालीन यंत्रणेच्या माध्यमातून विमानाचा कसून शोध घेत आहोत, आपण सर्वांनी खंबीर राहायला हवे.

बेपत्ता विमानाच्या शोधासाठी भारताचे सहकार्य

 भारतीय नौदलाने आपली काही अत्याधुनिक विमाने आणि जहाजे शोध आणि बचावकार्यासाठी तयार ठेवली आहे. यामध्ये 1 बोईंग P8I विमान, जे इतर गोष्टींसह शोधकार्यातही मदत करू शकतं, आणि 3 जहाजं सज्ज ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूमधल्या आराक्कोणम इथे INS राजली या तळावर ही तयारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आदेश येताच मदतकार्यात भारतीय नौदल सामिल होईल, असं सांगण्यात येतं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close