फ्लॅशबॅक 2014 : धुमसतं आंतरराष्ट्रीय वर्ष…

December 28, 2014 8:54 PM0 commentsViews:

An army soldier stands by blood on the floor at the Army Public School, which was attacked by Taliban gunmen, in Peshawar, December 17, 2014. Taliban gunmen in Pakistan took hundreds of students and teachers hostage on Tuesday in a school in the northwestern city of Peshawar, military officials said. REUTERS/Zohra Bensemra (PAKISTAN - Tags: CRIME LAW MILITARY CIVIL UNREST) - RTR4IDTTNew Delhi: Nobel Peace Prize winner Kailash Satyarthi holds up his Nobel diploma as he poses with children after paying tribute at Raj Ghat in New Delhi on Sunday. PTI Photo by Manvender Vashist(PTI12_14_2014_000038B)

यावर्षीचे डोळ्यासमोरून न हटणारे, न विसरता येणारे चेहरे. हे वर्ष दहशतवादी हल्ल्यांचं होतं. दहशतवादाचा आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर चेहरा आपल्यासमोर आलाय. या सगळ्यात हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे जगभरातली निरागस मुलं या दहशतवादाची बळी ठरली आहेत. पण याच वर्षी बालहक्कांसाठी लढणारे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची निर्भीड मुलगी मलालाला शांततेचं नोबेल मिळालं आहे. दहशतीविरोधात लढणार्‍या मलालाचा बुलंद आवाज 2014 चा आवाज बनला आहे.

आयसिस आणि तालिबान्यांच्या विरोधातलं युद्ध यावर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं. पण त्याहीपेक्षा आणखी एक वेगळं युद्ध होतं ‘इबोला’चं. म्हणूनच आफ्रिकेत थैमान माजवणार्‍या इबोलाशी लढणारे डॉक्टर्स आणि संशोधक ठरलेत ‘पर्सन ऑफ द इयर’. जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकानं या इबोला फायटर्सची ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवड केली. या सन्मानामुळे जगाला आफ्रिकेतल्या या खर्‍या हीरोंची ओळख झाली.

इबोला नावाच्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढणारे हे मास्क लावलेले चेहरे… पश्चिम आफ्रिकेतल्या दुर्गम भागात जाऊन इबोलाच्या रुग्णांची सुटका करणारे हे लढवय्ये… यावर्षीचे ‘टाइम’ मासिकाचे ‘पर्सन ऑफ द इयर’ आहेत. पश्चिम आफ्रिकेतल्या लायबेरिया, नायजेरिया, सीरिया लिओन या देशांमध्ये वर्षभर इबोलानं थैमान माजवलं होतं. आफ्रिकेतल्या लायबेरिया या देशात पहिल्यांदा इबोलाची लागण झाली आणि हळूहळू या आजारानं 13 हजार जणांना आपल्या जाळ्यात ओढलं. 5 हजारांपेक्षा जास्त जणांचा आतापर्यंत इबोलानं मृत्यू झालाय. इबोलावर अजून कुठलंही रामबाण औषध नाहीये. त्यामुळे यावर उपचार करताना प्रत्येक क्षणाला असतो संसर्गाचा धोका. त्यातच साधनसामग्रीची कमतरता. अशा प्रतिकूल परिस्थितीत या डॉक्टर्स, नर्सेस आणि संशोधकांनी प्राणपणानं इबोलाशी टक्कर दिली. या लढाईत अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला. पण हे लढवय्ये हटले नाहीत. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या लढवय्यांनी इबोलाशी लढा दिला. इबोलावर लस शोधण्यासाठी संशोधकही झटतायत. म्हणूनच युद्ध हे फक्त सीमेवरचं नसतं तर डॉक्टर्सही ते लढू शकतात हे या हीरोंनी सिद्ध करून दाखवलं, या शब्दात ‘टाइम’नं या लढवय्यांचा गौरव केलाय.

 इबोला फायटर्सच्या या प्रयत्नांमुळे इबोला सध्या नियंत्रणात आलाय. येत्या काही महिन्यांमध्ये इबोलावर ‘लस’ही उपलब्ध होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलंय. पण जोपर्यंत ही लस यशस्वी होत नाही तोपर्यंत या डॉक्टरांचा इबोलाविरुद्धचा संघर्ष असाच सुरू राहणार आहे.

यावर्षीची सगळ्यात वेदनादायी आठवण आहे ती पेशावर हल्ल्याची. अमेरिकेचा वर्ल्ड टॉवर सेंटरवरचा हल्ला आणि मुंबईचा 26/11चा यानंतरचा हा सगळ्यात भीषण आणि क्रूर हल्ला आहे. या हल्ल्यात बळी गेलेल्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोरून हटत नाहीत.

पाकिस्तानातलं पेशावर… पेशावरच्या मध्यवर्ती भागातलं आर्मी पब्लिक स्कूल… शाळेत सकाळी हसर्‍या चेहर्‍यांनी गेलेली मुलं दुपारी घरी परतली ती या कफनामध्ये… कफनामध्ये दिसणार्‍या या मुलांचा चेहरा पाकिस्तानच काय, अवघं जग कधीच विसरू शकणार नाही…

‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी शाळेत घुसले आणि अवघ्या 20 मिनिटांत शाळेचं स्मशान झालं… 133 मुलं कायमची पडद्याड गेली… दहशतवादाचा सगळ्यात क्रूर ‘चेहरा’ जगासमोर आला… जी मुलं या हल्ल्यातून बचावली त्यांच्या चेहर्‍यावरचं मावळलेलं हसू परत यायला आणखी किती काळ लागेल, हे आज कुणालाच सांगता येणार नाही…

या हल्ल्यानंतर पेशावरच्या प्रत्येक गल्लीतून जनाजे निघाले… पठाणी मिजाज मिरवणारं शहर उन्मळून पडलं. पण आता पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केलीय. तालिबान्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार केलाय. पेशावरच्या मुलांचे हे निरागस चेहरे दहशतवादविरोधी मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर सगळ्यांना आठवत राहणार आहेत…

यावर्षी हळहळ लावणारा एक चेहरा होता… अमेरिकन फोटो जर्नलिस्ट जेम्स फॉलीचा… आयसिसचे दहशतवादी क्रौर्याच्या कोणत्या थराला जाऊ शकतात हे दाखवणारं एक धक्कादायक दृश्य आपण पाहिलं… खरं तर पाहू शकलो नाही. पण एकटा जेम्स फॉलीच नाही तर आपल्या ताब्यात असलेल्या अशा आणखी काही पत्रकारांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आयसिसनं शिरच्छेद केलाय…

कधी थांबणार हे शिरच्छेद?

19 ऑगस्ट 2014
जेम्स फॉली या अमेरिकन फोटो जर्नलिस्टचा शिरच्छेद
नोव्हें. 2012 – उत्तर सीरियामधून अपहरण

2 सप्टेंबर 2014
अमेरिकन रिपोर्टर स्टीव्हन सॉटलॉफचा शिरच्छेद
4 ऑगस्ट 2013 – सीरिया-तुर्कस्तान सीमेवर अलेप्पोमधून अपहरण

13 सप्टेंबर 2014
डेव्हिड हेन्स या सामाजिक कार्यकर्त्याचा शिरच्छेद
मार्च – 2013 पॅरिसमधल्या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करताना दहशतवाद्यांच्या ताब्यात

24 सप्टेंबर 2014
फ्रान्सने हवाई हल्ले थांबवण्यास नकार दिल्यामुळे हर्व गॉर्डेल या फ्रेंच पर्यटकाचा शिरच्छेद
गॉर्डेलचं अल्जेरियामध्ये अपहरण

4 ऑक्टो. 2014
ऍलन हेनिंग या टॅक्सीचालकाचा शिरच्छेद
सीरियामधून झालं होतं अपहरण

अशा पद्धतीनं पत्रकार, कार्यकर्त्यांचे शिरच्छेद करणार्‍या आयसिसचा क्रूर चेहरा आहे, अबू बकर अल बगदादी… इराक आणि सीरियामधल्या यादवीनंतर या बगदादीने इस्लामिक स्टेट ऑफ आयसिस अँड इराक या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. याच वर्षीच्या 29 जूनला बगदादीनं जगभरातल्या मुस्लीम धर्मीयांची राजकीय, धामिर्क आणि लष्करी सत्ता आपणच आहोत, असं या बगदादीनं स्वत:च घोषित केलं. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात बगदादी मारला गेला, अशी बातमी नोव्हेंबर म हिन्यात आली पण बगदादीचा दुसराच सहकारी मारला गेला असंही कळलं. पण तेव्हापासून बगदादीविरुद्धची मोहीम अमेरिकेनं अधिक तीव्र केलीय. ओसामा बिन लादेनसारखंच या बगदादीला मारण्यासाठी अमेरिका जंगजंग पछाडतेय.

दहशतवादाचं थैमान, आयसिस आणि तालिबान्यांची झुंडशाही याविरोधात लढायचं असेल तर निर्भीडपणे आणि शांतीच्या मार्गाने… हा संदेश ठसवणारा मलालाचा चेहरा यावर्षीचा सगळ्यात प्रभावी चेहरा आहे..

शांततेचं नोबेल मिळाल्यानंतर अवघ्या जगाशी थेट संवाद साधणारा मलालाचा हा निर्भीड चेहरा…पाकिस्तानच्या स्वातमधली ही मुलगी यावर्षी सगळ्यांच्याच मनावर ठसली. मलाला आता
शिक्षणाची आस असणार्‍या जगातल्या सगळ्या मुलांचा चेहरा बनलीय…

मलाला स्वात खोर्‍यातल्या मिंगोरासारख्या दुर्गम प्रदेशातली. स्वातवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला आणि 2009 नंतर परिस्थिती बदलली…मुलींची शाळा बंद झाली….या वातावरणात घुसमट झालेल्या मलालानंं बीबीसीवर `गुल मकाई` या टोपण नावानं डायरी लिहिली आणि इथलं वास्तव जगासमोर आलं. पण या उद्गारांची किंमत तिला मोजावी लागली….तालिबान्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेतानाचा मलालाचा काळजाचा ठोका चुकवणारा चेहराही सगळ्यांच्याच लक्षात आहे.

पण हा भूतकाळ मागे सारत पुन्हा एकदा नितळ चेहर्‍याची मलाला पुन्हा सगळ्यांसमोर आली… शिक्षण किती मूल्यवान आहे..हे ती अमेरिका, ब्रिटनमधल्या मुलांना कळकळीनं सांगते… स्वातमधल्या शाळेत मुलींसाठी शाळा काढण्याचा निर्धार तिनं केलाय. मलालाच्या धैर्याला आणि शौर्याला आयबीएन-लोकमतचा सलाम.

बालहक्कांसाठी लढणारे कैलाश सत्यार्थी नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीयांनाही माहीत झाले. बालहक्कांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल जगानं घेतली आणि जगभरातल्या बालमजुरांच्या व्यथेला वाचा फोडणारा एक चेहरा आपल्यासमोर आला. बालमजुरांसाठी लढताना कैलाश सत्याथीर्ंना एक मुलगा भेटला. या मुलाची बोटं मशीनमध्ये कापली गेली होती. तो कैलाश  सत्यार्थी यांना म्हणाला, अब मैं पतंग नहीं उडा सकता.  त्याच्या या उद्गारांनी हेलावून गेलेल्या कैलाश सत्यार्थी यांनी बचपन बचाओचं मिशन हाती घेतलं. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळहून 60 किलोमीटर अंतरावरचं विदिशा. बालहक्कांसाठी लढणार्‍या, बालमजुरीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कैलाशसत्यार्थी यांचं हे गाव. गेल्या 35 वर्षांपासून बालमजुरांची सुटका करण्यासाठी संघर्ष करतायत. त्यांनी 80 हजार मुलांना नवं जीवन मिळवून दिलंय. कैलाश सत्यार्थी यांचं  काम 11 राज्यांमध्ये पसरलंय. 14 वर्षांच्या खालच्या मुलींना शाळा सोडायला लागू नये यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. जगभरामध्ये आधी 16 कोटी 80 लाख मुलं मजुरी करत होती. पण गेल्या वर्षात हा 7 कोटी 80 लाखांवर आकडा आलाय. या प्रगतीत कैलाश सत्यार्थी यांचं योगदान मोठं आहे.

2014च्या आंतरराष्ट्रीय वर्षात आंतरराष्ट्रीय राजकारणातला उगवता चेहरा बनले नरेंद्र मोदी. ज्या अमेरिकेनं काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींना व्हिसा नाकारला होता त्याच अमेरिकेत मॅडिसन स्क्वेअरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. मोदींच्या या ऐतिहासिक भाषणाची दखल जगानं घेतली. लोकसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड बहुमत आणि कणखर नेतृत्व अशी असलेली इमेज यामुळे जगभरातल्या राष्ट्रांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन बदलतोय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी विश्‍वबंधुत्वाचा संदेश दिला. सार्क देशांच्या प्रमुखांना शपधविधीला बोलावून त्यांनी मास्टर स्ट्रोक लगावला होताच.  नंतर भूतान, नेपाळ, म्यानमार, जपान, फिजी या देशांना भेटी देत मोदींनी भारताचं जोरदार मार्केटिंग केलं. यात सर्वाधिक भेटी गाजल्या त्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातल्या. याचीच पुनरावृत्ती झाली ती ऑस्ट्रेलियात… जी-20 परिषदेसाठी गेलेल्या मोदींनी तिथं 30 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या… सिडनीमध्ये झालेल्या त्यांच्या भाषणासाठी तब्बल 200 भारतीय संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या. येणार्‍या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर येत आहेत… 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे असतील.  त्यामुळे येणारं 2015 हे वर्षही मोठ्या घडामोडींनी भरलेलं असणार आहे.

हे वर्ष जगभरातल्या मुलांवर झालेल्या अन्यायाची वेदना मनात ठेवून गेलंय. जुलै महिन्यात गाझा पट्टीत इस्रायलने हल्ला केला. यात सुमारे 2 हजार पॅलिस्टिनी नागरिक बळी पडले आणि यामध्ये 500 निरपराध मुलं मारली गेली. इस्रायलच्या अंदाधुंद हल्ल्यात मारल्या गेलेल्या या मुलांचे फोटो जगासमोर आले तेव्हा इस्रायलच्या या हल्ल्याची तीव्रता आपल्या सगळ्यांच्या ठळकपणे समोर आली. इस्रायली गुप्तचर संघटना हमासने इजिप्तचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारला आणि इस्रायलमध्ये हल्ले सुरूच ठेवले. इस्रायलच्या या लष्करी मोहिमेचं नाव होतं, ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज… ऑगस्ट महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी करार झाला आणि गाझा पट्टीत शांतता आली. पण तरीही वर्षानुवर्षं अस्थिर राहिलेली गाझा पट्टी अजून धुमसतेच आहे.

आफ्रिका खंडालाही यावर्षी दहशतवादानं ग्रासलं होतं. नायजेरियामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी 276 शाळकरी मुलींचं अपहरण केलं. एवढंच नाही तर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावून त्यांच्याशी जबरदस्तीनं लग्न करायला लावलं. बोको हरामने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे 300 जण मारले गेले. बोको हरामने नायजेरियामधल्या एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलांचा जीव गेला.

.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close