बंगळुरूतील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरेन रिजीजू

December 29, 2014 11:42 AM0 commentsViews:

bangaloreblast3

29 डिसेंबर : बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीट परिसरातील एका एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर रविवारी रात्री झालेला बॉम्बस्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज (सोमवारी) सांगितले. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता, तरी तो घडवण्यासाठी ‘आयईडी’चा वापर करण्यात आला होता.

चर्च स्ट्रीट परिसरातील ‘कोकोनट ग्रोव्ह’ हॉटेलच्या बाहेर रात्री 8.30 वाजता हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री के. सिद्धरामय्या यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला कर्नाटकचे गृहमंत्री के.जे.जॉर्ज आणि पोलीस खात्यातले उच्च पदावरचे अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, कालच्या स्फोटाची नेमकी माहिती आमच्याकडे नव्हती, एक साधारण अलर्ट मिळाला होता, असं जॉर्ज यांनी म्हटलं आहे. एनआयए तपासात सहभागी होईल, अनेक सरकारी विभाग तपासात गुंतलेत, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्लीत हाय अलर्ट

बंगळुरूतील स्फोटानंतर मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्लीत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री होणार्‍या जल्लोषावरही या स्फोटाचे सावट राहणार आहे.

केंद्राकडून सर्व मदत

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून केंद्राकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बंगळुरूमधील स्थितीची माहिती त्यांना दिली, अशा कोणत्याही घटनेला तोंड द्यायला केंद्र सरकार तयार असल्याचे राजनाथ सिंह यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close