गडचिरोलीत उपचार न मिळाल्याने बाळ दगावलं

December 29, 2014 3:47 PM0 commentsViews:

Gadchiroli

29 डिसेंबर  : सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातल्या असुविधांबद्दल आयबीएन लोकमतनं आवाज उठवला होता. या असुविधांचा फटका आता एका गर्भवती महिलेला बसला आहे. गर्भवती महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया सिरोंचा रुग्णालयात होऊ न शकल्याने तिचे बाळ दगावले आहे. सिरोंचा तालुक्यात अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या जंगलपल्ली गावातल्या समक्का तेरकरी या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर अंकिसाच्या या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. पण प्रसुतीदरम्यान बाळाचे केवळ हात बाहेर आल्यानं प्रसुती नीट होऊ शकली नाही.

प्रसुती शस्त्रक्रियेची सोय नसल्याने या महिलेला डॉक्टरनी स्वत: सिरोंचात आणलं, पण ग्रामीण रुग्णालयात सोय नसल्याने त्या महिलेला प्राणहिता नदीच्या पलीकडून तेलंगणाच्या गोदावरी खनीला नेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तोपर्यंत बाळ पोटात दगावलं. या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे पण सिरोंचा आरोग्य खात्याचे तीन तेरा वाजल्यामुळे एका दिवसात चारशे किलोमीटरचे अंतर तुडवूनही या तान्हुल्यांचे प्राण आरोग्य खाते वाचवू शकले नाही.

या घटनेमुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची खरी परिस्थिती समोर आली आहे. या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिरोंचा सारख्या नक्षलग्रस्त तालुक्यात वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे आजवर शेकडो बालके दगावली आहेत. हे प्रकरण IBN लोकमतने लावून धरल्यानंतर आरोग्य खात्यावर टीका होत आहे. आरोग्य सेवेअभावी स्थानिक आदिवासींना जीव गमवावा लागत आहे त्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close