मुख्यमंत्र्यांचा ऐन गर्दीत रेल्वेप्रवास!

December 30, 2014 6:54 PM0 commentsViews:

 

30 डिसेंबर  : मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या उपनगरीय प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी सव्वासहाची वेळ म्हणजे प्रचंड गदच्ची वेळ! या वेळेत आपल्याला धक्का मारून जाणार्‍या प्रवाशाला बघायलाही दुसर्‍याला वेळ नसतो. मात्र सोमवारी या वेळी गहजब झाला. महाराष्ट्राच्या सर्वोच्च राजकीय पदी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानकात आले आणि अनेक नजरा त्यांच्यावर थांबल्या. मात्र, स्टेशनवर कुठेही न थांबता त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या कल्याण लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवेश केला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

कुलाब्याला असलेल्या एका कार्यक्रमानंतर तातडीने कल्याण येथील एका कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही अखेर रेल्वेचाच आधार घेतला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी कुलाबा येथे एका कार्यक्रमात होते. त्यानंतर सायंकाळी त्यांना कल्याण येथे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीच्या एका कार्यक्रमासाठी पोहोचायचे होते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर असलेल्या वाहतुकीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट रेल्वेमार्गाने प्रवास करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी रीतसर तिकीट काढून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक पाच गाठला. या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली 6.29 कल्याण ही सेमीफास्ट गाडी मुख्यमंत्र्यांनी पकडली. फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास करत फडणवीस यांनी प्रवाशांशीही संवाद साधला. यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षकही त्यांच्यासोबत होते. प्रवाशांच्या अडचणी काय, त्या दूर करण्यासाठी राज्याकडून काय करता येईल, या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. आणि अशा प्रकारे रस्तेमार्गाने दोन-अडीच तासांचे अंतर रेल्वेमार्गामुळे मुख्यमंत्र्यांनी सव्वा तासातच पार केले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close