फ्लॅशबॅक 2014 : हे वर्ष मोदींचेच…अन् सत्तासंघर्षाचे…!!

December 30, 2014 8:32 PM0 commentsViews:

The Prime Minister, Shri Narendra Modi releasing the Mission Document of the ‘Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY)’, in New Delhi on August 28, 2014. 
	The Union Minister for Finance, Corporate Affairs and Defence, Shri Arun Jaitley, the Minister of State for Commerce & Industry (Independent Charge), Finance and Corporate Affairs, Smt. Nirmala Sitharaman, the Principal Secretary to Prime Minister, Shri Nripendra Misra, the Governor of Reserve Bank of India, Shri Raghuram Rajan and other dignitaries are also seen.

मैं नरेंद्र दामोदरदास मोदी

2014 हे वर्ष नरेंद्र दामोदरदास मोदी या जादूगाराचं होतं. देशात मोदी नावाचं वादळ नव्हे, त्सुनामी आली होती… आणि यात बाकी सगळ्यांची दाणादाण उडाली… निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं… तेव्हा सामना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असेल… असं चित्र रंगवलं गेलं… पण हे साफ खोटं ठरलं… निकाल तर नंतरची गोष्ट… प्रचारसभेतच मोदींसमोर राहुलनी हार मानली होती… मोदींचा विजय ऐतिहासिक होता… तब्बल 30 वर्षांनंतर आघाडीचं राजकारण मोदींनी मोडून काढलं होतं… वर्षानुवर्षे सत्तेत असणार्‍या काँग्रेसला हादरा दिला होता… मुजोर झालेल्या प्रादेशिक पक्षांना वेसण घातलं होतं…

या गंगेनं मोदींना भरभरून दान दिलं… वाराणसीतली प्रतिष्ठेची लढाई मोदींनी जिंकलीच… पण उत्तर प्रदेशमधल्या सर्वच पक्षांना अक्षरश: ठोकून काढलं… मुख्यमंत्री होण्यासाठीच गुजरात विधानसभेत मोदींनी पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं… आणि आता संसदेत पहिल्यांदा पाऊल टाकत होते… ते पंतप्रधान होण्यासाठीच… भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर संसदेच्या सभागृहात मोदींनी केलेलं भाषण हे त्यांच्या प्रचारसभेतल्या भाषणापेक्षा पूर्णपणे वेगळं ठरलं… निवडणुकीत घणाघाती हल्ला करणारे मोदी भावनावश झालेले अख्ख्या देशानं पाहिले…

शहा पर्वाचा उदय…

2014च्या वर्षात कमालीची उत्सुकता, जोरदार टीका आणि अभूतपूर्व यश… या सगळ्यांचा धनी ठरलेला चेहरा म्हणजे अमित शहा. हे वर्ष सुरू होत होतं तेव्हा अमित शहांची कुणाला फारशी ओळख नव्हती. गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री, नरेंद्र मोदींचे विश्वासू, भाजपचे यूपी प्रभारी आणि सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातले आरोपी म्हणून ते ठाऊक होते. पण लोकसभेच्या निकालानंतर अमित शहांबद्दल पुनर्विचार करणं सगळ्यांनाच भाग पडलं. भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी तब्बल 71 जागा जिंकल्या आणि हे शक्य झालं… अमित शहांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि अभ्यासपूर्वक तयार केलेल्या रणनीतीमुळे इथून पुढे अमित शहांच्या नावाचा जयजयकार सुरू झाला. तेव्हाचे अध्यक्ष राजनाथ सरकारमध्ये सामील झाले आणि अमित शहांना यूपीच्या अभूतपूर्व विजयाच्या वातावरणात भाजपचं अध्यक्ष बनवलं गेलं. पक्ष आणि बाहेरच्या विरोधकांनी हा मोदींचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रकार आहे अशी कुजबूज आणि टीका चालवली खरी, पण नंतरच्या निवडणुकांनी अमित शहा हा निवडणुकांसाठी मेहनती माणूस आहे, हेसुद्धा दाखवून दिलंय.

लोकसभेनंतर भाजपसमोर आव्हान होतं महाराष्ट्र विधानसभेचं. शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर भाजपचं काय होणार, हा प्रश्न होता. अमित शहांनी मग ही जबाबदारी स्वत:च्या हाती घेतली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच भाजपचा नेता बसला. हरियाणा तर भाजपने एकहाती जिंकलं. वर्षअखेर झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही चांगलं यश मिळालं. प्रत्येक निवडणुकीसरशी शहांचा आत्मविश्वास वाढत गेला. यादरम्यानच त्यांनी 2016 साली होणार्‍या बंगाल विधानसभा निवडणुकांची तुतारी फुंकली. थेट कोलकात्यात जाऊन त्यांनी ममतांना ललकारलं.

एकीकडे शहांचा अश्वमेध एक-एक राज्य पादाक्रांत करत असताना त्यांना कठोर टीकेलाही तोंड द्यावं लागलं. मोदी विकासाचा अजेंडा राबवत असले तरी संघ परिवाराचा खरा अजेंडा हा आक्रमक हिंदुत्वाचा आहे आणि शहा तो रेटत आहेत असे आरोप होऊ लागले. आधी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर शहांना स्पष्टीकरणं द्यावी लागली…

दीड वर्षापूर्वीच गलितगात्र वाटणार्‍या भाजपला तारलं ते मोदी लाटेने. पण लाट फार काळ टिकत नाही याचं भान शहांना आहे. म्हणूनच त्यांनी ऑनलाईन पक्ष नोंदणीसारख्या कल्पक योजना पुढे केल्या आणि पक्ष सदस्यांच्या संख्येने कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली.

राज्यात देवेंद्र

मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस… तरुण, अभ्यासू, सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला…

पण देवेंद्र यांचा हा मार्ग सोपा नव्हता… गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र भाजपचा चेहरा कोण? याची चर्चा रंगली… लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोदी लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रही काबीज करू, अशी खात्रीच भाजपला होती…पण मुख्यमंत्री कोण हा तिढा मात्र सुटला नव्हता… नागपूरमधल्या प्रचारसभेत खुद्द मोदींनीच देवेंद्र यांची पाठ थोपटली आणि याचं उत्तर मिळालं…

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा निवडणुकीत गाजली… पण नितीन गडकरींच्या समर्थकांनीही केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला… खडसेंनीही रान पेटवलं… पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उत्सुक होते…पण फडणवीस मात्र शांत होते… आणि अखेर मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली…
वादापासून कायम दूर राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांची नवी इनिंग मात्र वादानं सुरू झाली… राष्ट्रवादीसोबत सोयरीक करणार नाही, असं आधी ठणकावून सांगणार्‍या फडणवीसांनी त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं… अभूतपूर्व गोंधळात… आवाजी मतदानानं त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, पण लोकांचा विश्वास गमावला अशी टीका विरोधकांनी केली.

तारेवरची कसरत करत त्यांनी नंतर सेनेला सरकारमध्ये घेतलं…
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 7 हजार कोटींचं पॅकेज, गारपीटग्रस्तांना भरीव मदत, केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडणं, विदर्भासाठी अनेक योजनांची घोषणा, नागपूरमध्ये राज्यातल्या पहिल्या IIMची घोषणा, 22 शहरांच्या विकास आराखड्याला मंजुरी, मराठा आरक्षणासह 11 विधेयकं मंजूर करणं, एसीबीच्या सर्व चौकशींना मंजुरी असे अनेक निर्णय फडणवीसांनी पहिल्या दोन महिन्यांच्या आत घेतले…

फडणवीस सरकारचे निर्णय

- शेतकर्‍यांसाठी 7 कोटींचं पॅकेज
- गारपीटग्रस्तांना भरीव मदत
- केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडला
- विदर्भासाठी योजना
- नागपूरसाठी IIM
- 22 शहरांसाठी विकास आराखडा
- मराठा आरक्षणासह 11 विधेयकं मंजूर
- ACBच्या सर्व चौकशींना मंजुरी

पण निवडणुकीपूर्वीच दिलेलं एलबीटी रद्द आणि टोलमुक्तीची आश्वासनं मात्र त्यांना पाळता आली नाहीत… मुंबईच्या समितीवरून झालेला वाद, इंदू मिलचा प्रलंबित प्रश्न, मुस्लीम आरक्षणाला मंजुरी न मिळणं, धनगर आरक्षणाचं न पाळलेलं आश्वासन… असे अनेक मुद्दे आता त्यांना 2015 साली सोडवावे लागणार आहेत.

उत्तम फ्लोअर मॅनेजमेंट करत देवेंद्रनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून झुलवत ठेवलं. विरोधकांच्या विविध प्रश्नांचा पाडाव केला. पण आता स्थिरावलेल्या देवेंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायची आहे. निरनिराळ्या मुद्द्यांवरून तत्कालीन आघाडी सरकारची झोप उडवणारे देवेंद्र फडणवीस आता त्याच जनतेसाठी काय करतात, त्याचं उत्तर 2015 मध्ये मिळू शकेल…

हार कर भी जितनेवाले को शरद पवार कहते है…

‘हार कर भी जितनेवाले को बाजीगर कहते हैं…’ बाजीगरमधल्या या डॉयलॉगची आठवण शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करून दिली… निकाल पूर्णपणे जाहीर होण्याच्या आतच राष्ट्रवादीने भाजपला विनाअट पाठिंबा जाहीर केला आणि राजकारणाला कलाटणी दिली…

लोकसभेत राष्ट्रवादीला अवघ्या 4 जागा मिळाल्या…पवारांनी यावेळी लोकसभा न लढवता राज्यसभेत जाणं पसंत केलं… त्यानंतर आघाडी तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक स्वबळावर सामोरे गेले… पण सत्तेत येण्याची आशा नव्हतीच…राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाराच्या आरोपांनी घायाळ झाले होते… राष्ट्रवादीच्या पदरी अपयश आलं… पण आशा मात्र संपली नव्हती…

सरकारला करायचं नाही, पण सेना सोबत गेली तर सुंठीवाचून खोकला गेला.

उलटसुलट विधानांनी पवारांनी भाजप आणि शिवसेनेला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर सेना सत्तेत गेली आणि पवारांची चाल अयशस्वी ठरली… आता राष्ट्रवादीला पुन्हा सावरण्याची आणि नेत्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी पवारांवर आहे…

एका जिंकलेला सेनेचा राजा, पण…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेचं काय होईल, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत दिलं… लोकसभेत शिवसेनेचे कधी नव्हे ते 18 खासदार निवडून आले… त्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या उद्धवनी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन 151ची घोषणा करून भाजपसोबत नवं युद्ध छेडलं…

‘हम देनेवाले हैं… लेनेवाले नहीं…’ भाजप आणि शिवसेनेतला वाद चिघळला… आणि 25 वर्षांची युती तुटली… यानंतर पेटून उठलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवरच शरसंधान केलं…

विधानसभा निवडणुकीत सेना दुसरा मोठा पक्ष झाला, पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केल्यावर आता काय करावं यावरून उद्धव ठाकरे अनेक दिवस द्विधा मन:स्थितीत होते. आधी विरोधी पक्षात बसलेली सेना महिनाभरातच सत्तेत शिरली… पण या सर्व गोंधळात 2014च्या सुरुवातीला एक खमक्या नेता अशी उद्धव यांची असलेली प्रतिमा वर्ष सरता सरता गोंधळलेला नेता अशी झाली.

इंजिन घसरले… राज जमिनीवर उतरले

उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरे यांचा प्रभाव 2014 साली नेस्तनाबूत झाला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी जुन्याच टोलच्या मुद्द्याला फोडणी द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं… गेल्यावेळी एक्स फॅक्टर ठरलेल्या मनसेचा विधानसभेत एकच आमदार निवडून आला.

बाबांची कन्या पंकजा…

या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे-पालवेंनी… गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर दु:ख विसरून पंकजांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेला… भाजपच्या कोअर कमिटीमध्ये त्यांना स्थान मिळालं… संघर्ष यात्रेच्या निमित्तानं पंकजा लोकांपर्यंत पोहोचल्या. आपल्या आवेशपूर्ण भाषणानं त्यांनी मुंडे समर्थकांमध्ये एक नवा जोश निर्माण केला. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही पंकजांचं नावं चर्चेत आलं… देवेंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्या ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री बनल्या…

एमआयएमचा शिरकाव…

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवलं ते हैदराबादेतल्या मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन या पक्षानं. ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षाचा एक आमदार मराठवाडा आणि दुसरा आमदार मुंबईतून निवडून आला. कट्टर विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या MIMचं महाराष्ट्रातलं हे यश सर्वांना विचार करायला लावणारं आहे…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close