ना’पाक’ हल्ल्यांना भारताचे उत्तर, 3 पाक सैनिक ठार

January 3, 2015 2:53 PM0 commentsViews:

pak_firing_2ndjan03 जानेवारी : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरमधील हीरानगर आणि सांबा सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पाककडून गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात एक भारतीय महिलेचा मृत्यू झालाय, तर चार गावकरी जखमी झाले आहे. भारतीय लष्करानं याचं चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानचे तीन जवान गोळीबारात मारले गेले आहे.

पाकिस्तानाने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. गुरुवारी 31 डिसेंबर सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी सीमा रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. बीएसएफच्या जवानांनी याला चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाकचे चार जवान टिपले गेले. एवढंच नाहीतर बीएसएफ जवानांच्या आक्रमक गोळीबारापुढे पाक सैनिकांना शरणागती पत्कारावी लागली होती. मात्र तरी पाकिस्तानी सैनिकांना यातून धडा घेता आला नाही. शुक्रवारी मध्यरात्री पाककडून पुन्हा गोळीबार सुरू झालाय.जम्मू आणि काश्मीरमधील हीरानगर आणि सांबा सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केलाय. या गोळीबारात एक महिला जखमी झाली होती. त्या महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. पाक सैनिकांच्या गोळीबारात हीरानगर भागातील गावकरीही जखमी झाले. पाकच्या नापाक कृत्यामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी परखड शब्दांत टीका केलीय. अनेक वेळा पराभूत होऊनही पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय. आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत असं राजनाथ म्हणाले. तर दुसरीकडे आमच्यावर हल्ले कराल, तर सडेतोड उत्तर देऊ, ज्यात तुमचं प्रचंड नुकसान होईल, असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर याआधीच म्हणाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close