पाकच्या त्या बोटीबरोबर आणखी एक बोट होती ?

January 3, 2015 4:01 PM0 commentsViews:

pakboat02 जानेवारी : 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी दहशतवादी ज्या पद्धतीने भारतात घुसले होते तसाच प्रयत्न 31 डिसेंबरच्या रात्री होणार होता पण सतर्क तटरक्षक दलाने तो हाणून पाडला. तटरक्षक दलाने पाकिस्तानकडून आलेल्या एका बोटीला अडवलं होतं पण बोटीवरील चौघांनी बोटीवरच स्फोट घडवून आणला होता. पण याचवेळी दुसरी एक बोटही भारताच्या हद्दीत होती आणि तिचा शोध सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी IBN नेटवर्कला दिलीय. ही बोट मच्छीमारांच्या बोटींबरोबर मिसळल्यामुळे तिला त्या दिवशी शोधता आलं नाही असंही सांगण्यात आलंय.

गुजरातच्या समुद्रात एक मोठा अतिरेकी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात तटरक्षक दलाला यश आलंय. पोरबंदरच्या समुद्रात तटरक्षक दलाच्या दक्षतेमुळे अतिरेकी हल्ल्याचा हा कट फिस्कटला. हा सर्व प्रकार 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री घडला. कराचीहून निघालेल्या एका मच्छिमारी बोटीनं अरबी समुद्रात भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. तब्बल 8 किलोमीटर आतमध्ये ही बोट आली होती. या बोटीवर 4 लोक आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती. तटरक्षक दलानं या बोटीला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा दिला. पण या बोटीनं वेगानं भारताच्या हद्दीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे तासभर तटरक्षक दलानं या बोटीचा पाठलाग केला. तसंच इशार्‍यादाखल गोळीबारही केला. त्यानंतर ही पाकिस्तानी बोट थांबली. पण, या बोटीवरचे कर्मचारी खालच्या भागात लपले आणि त्यांनी बोट पेटवून दिली. त्यानंतर बोटीचा स्फोट झाला. ती बोट जागेवरच बुडालीय. पण हा पाठलाग सुरू असताना आणखी एक बोट भारतीय हद्दीत घुसली होती असा दावा ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्त पत्राने केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या बोटीसोबतच ही बोट भारताच्या दिशेनं येत होती. जेव्हा तटरक्षक दलाने पहिली बोट अडवली आणि त्यानंतर बोटीत स्फोट झाला हे पाहून या बोटीने आपला मार्ग बदलला. ती बोट पुन्हा पाकिस्तानच्या समुद्राच्या हद्दीत दाखल झाली. या दुसर्‍या बोटीबद्दल माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे. दहशतवादी पुन्हा एकदा 26/11 प्रमाणे हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहितीही सूत्रांनी दिली. या प्रकारानंतर भारतातील सर्व समुद्र किनार्‍यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close