गळ्याला फास अन् मदतीची आस !

January 5, 2015 10:37 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

05 जानेवारी : मराठवाड्यातला शेतकरी आणि शेती दुष्टचक्रात अडकले आहेत. यातून बाहेर पडण्याचा शेतकरी प्रयत्न करतोय. पण त्याला निसर्ग साथ देत नाहीये. गेल्या वर्षभरात मराठवाड्यात 570 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. राज्य सरकारने मदतीची घोषणा केलीये. पण ही मदत केव्हा पोहोचणार हा खरा प्रश्न आहे.

farmaer_susidepkgपैठण तालुक्याच्या केतक जळगाव शिवारातील ही कोरडी विहीर हनुमान बनकर यांच्या आत्महत्येचं कारण बनलीये. या विहिरीनं या म्हातार्‍या आईवडलांच्या आधार हिरावून घेतलाय. लहरी पावसावर अवलंबून राहायचं नको म्हणून बनकर यांनी कर्ज काढून दीड एकर शेतीसाठी विहीर खोदली…पण विहिरीला पाणी लागलं नाही. आता कर्ज फेडायचं कसं याचा धसका घेऊन बनकर यांनी शेतातल्या वीजेची तार हातात धरून आत्महत्या केली.

परळी तालुक्यातल्या उद्धव गीते यांची कहाणीही हेलावून टाकणारी आहे. गीतेंनी दोन एकर शेतीवर कर्ज काढलं. शेती फुलवायचं स्वप्न बघत विहीर खोदली. पण पाणी लागलं नाही. उद्धव गीतेंनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवानं त्यात ते बचावले. वडलांना वाचवण्यासाठी मुलगा अर्जुन गीतेनं कर्ज काढलं. पण बापाचा जीव वाचवणार्‍या मुलानंच कर्ज फेडण्याच्या चिंतेनं आयुष्य संपवलं.

मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांनी प्रत्येक वर्षी पावसाच्या आशेवर पेरणी केली. पण जे काही थोडंफार उगवलं ते गारपिटीने झोपवलं. सरकारनं मदतीचं पॅकेज जाहीर केलं. पण ही मदत अजून शेतकर्‍यापर्यंत पोहोचायची आहे. त्याकडे आस लागलेल्या बळीराजाचा फास कधी दूर होणार हा खरा प्रश्न आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close