‘फुलराणी’ची नाराजी दूर, ‘पद्मभूषण’साठी अखेर शिफारस

January 5, 2015 11:59 PM0 commentsViews:

saina_nehwal_new05 जानेवारी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू अर्थात ‘फुलराणी’ सायना नेहवालची नाराजी आता दूर झालीये. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सायना नेहवालची पद्म भूषणसाठी शिफारस केलीये. या पुरस्कारासाठी शिफारस न केल्याबद्दल सायनानं ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज (सोमवार) क्रीडा मंत्रालयाने सायनाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करून नाराजीचा ‘शटल’ दूर टोलावलाय.

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू आणि ऑलम्पिक पदकाला गवसणी घालणार्‍या सायनाने पद्मभूषण पुरस्कारासाठी नाव न जाहीर झाल्यामुळे उघड नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या अगोदर ऑलम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारच्या नावाची दोनदा शिफारस केली होती. पण सुशील कुमार याच्या नावाचा शिफारस केली पण माझ्या नावाची शिफारस का केली नाही असा सवालच सायनाने उपस्थित केला. खरंतर क्रीडा मंत्रालयाने 2010 साली सायनाला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. पण यंदा पद्मभूषणसाठी शिफारस न केल्यामुळे सायनाने नाराजी व्यक्त केली. पद्म पुरस्कारासाठी 5 वर्षांच्या कालावधीचं अंतर असायला हवं असतं आणि आपण ते आता पार केलंय त्यामुळे आपलं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवावं असा युक्तीवाद सायनाने केला होता. सायनाची नाराजी लक्षात घेत क्रीडा मंत्रालयाने पद्मभूषणसाठी शिफारस केलीये. क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणी लक्ष घालू आणि गृह मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस करता येईल का ते पाहू असं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिलं होतं. सायनाच्या नावाची शिफारस करणारं बॅडमिंटन असोसिएशनचं पत्र आपल्याला शनिवारीच मिळालं असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close