निवडणूकीच्या पराभवावर भाजपच्या चिंतन बैठकीत गदारोळ

August 21, 2009 4:57 PM0 commentsViews: 2

21 ऑगस्टभाजपचं चिंतन फार गाजलं. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची चिरफाड करण्याचा उद्देश या बैठकीमागे होता. चिंतन बैठकीनंतर पक्षात कोणतेही वाद नाहीत असा दावा जरी भाजपने केला असला तरी लोकसभा निवडणुकीनंतर कमळाची एकेक पाकळी गळू लागल्याचं सगळ्यांनीच पाहिलं. पण नेत्यांमधल्या लाथाळ्या, संघाला खूष करण्यासाठी जसवंत सिंगांना दिलेला डच्चू यामुळे ही बैठक गाजली. चिंतन बैठकीच्या सुरूवातीपासूनच आरएसएससमोर आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा दिसत होती. या स्पर्धेत जसवंत सिंगांचा बळी घेत राजनाथ सिंगांनी पहिला पॉईंट मिळवला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी बाळ आपटे समितीचा अहवाल लिक झाला. यात अडवाणी आणि त्यांच्या पक्षातील समर्थकांना जबाबदार धरण्यात आल्याचं स्पष्ट झालं. पण लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी राजनाथ सिंग यांनी याआधीच स्वीकारली असल्याने हा मुद्दा तिथेच थंडावला. काही विशिष्ट नेत्यांनी पक्ष ताब्यात घेतल्याची टीका अरुण शौरी यांनी केली. त्यांचा रोख अरुण जेटलींकडे असल्याची चर्चा होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री बी.सी. खंडुरी यांना पायउतार करण्यात आलं, तर वसुंधरा राजेंना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उघडपणे बंड केलं.संघाने 2005 मध्ये तरुणांना संधी देण्याचा सल्ला वाजपेयी आणि अडवाणींना दिला होता. त्याची दखल मात्र घेतली गेली नाही. मात्र 2009 मध्ये संघाच्या एका इशार्‍यानंतर राजनाथ सिंगांनी जसवंत सिंगांना बाहेर काढलं आणि पक्ष संघाच्या शब्दाबाहेर नाही हे सिद्ध केलं. लालकृष्ण अडवाणी हेच विरोधी पक्षनेते म्हणून यापुढेही काम करतील असं पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी जाहीर केलं. तर लोकसभा निवडणुकीतल्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी अध्यक्ष म्हणून आपण स्वीकारत असल्याचंही त्यांनी सांगितलं.या सर्व गदारोळात लोहपुरूष अडवाणी मात्र तिथेच उभे राहीले. आपल्याकडे कमी वेळ आहे हे त्यांनी माहित असलं तरी पक्षाला एकसंध ठेवण्यात ते सध्या तरी यशस्वी झालेत.

close