पॅरीस अतिरेकी हल्ला : तरुण दहशतवादी पोलिसांना शरण

January 8, 2015 9:03 AM0 commentsViews:

ParisShooting (7)

08  जानेवारी : पॅरीसमधल्या चार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ऑफिसवर काल (बुधवारी) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील तीन आरोपींपैकी एका हल्लेखोराने शरणागती पत्करली आहे.

तीन हल्लेखोरांपैकी हेमंड मोर्राड हा 18 वर्षांचा दहशतवादी पोलिसांना शरण गेला आहे. तर सईद क्वाची आणि शेरीफ क्वाची हे दोन दहशतवादी फरार आहेत. हे दोघेही भाऊ असून, पोलिसांनी त्यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. येमेनी अतिरेक्यांशी या दोघांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. हल्ल्याच्या तपासात अमेरिकेनेही मदत देऊ केली आहे.

पॅरीसमधील चार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये संपादकांची बैठक सुरू असताना हा हल्ला झाला. त्यात 12 जण ठार तर 20 जण जखमी झाले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये साप्ताहिकाचे मुख्य संपादक आणि व्यंगचित्रकार यांचाही समावेश आहे.

या घटनेनंतर संपूर्ण फ्रान्समधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या या साप्ताहिकाच्या ऑफिसवर 2011मध्येही हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी क्लाशनिकोव्ह रायफली आणि रॉकेट लाँचर घेऊन साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये घुसले होते. त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत 9 पत्रकारांसह 2 पोलिसांना ठार केले.

दरम्यान, पॅरीसवरच्या दहशतवादी हल्ल्याने फ्रान्समधल्या नागरिकांना धक्का बसला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये नागरिकांनी चर्चमध्ये प्रार्थना केल्या आणि मूक मोर्चा काढत हल्ल्याचा निषेध केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close