पॅरिसमध्ये गेल्या 24 तासांत 3 दहशतवादी हल्ले

January 8, 2015 2:32 PM0 commentsViews:

ParisShooting (10)

08 जानेवारी : ‘चार्ली हेब्दो’या साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून सावरण्याआधी पुन्हा एकदा पॅरिस दहशतवादी हल्ल्याने हादरलीये. कालच्या हल्ल्याला 24 तास उलटत नाही तेच पॅरिसच्या दक्षिण भागात एका अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 1 पोलीस जखमी झालाय. या गोळीबारानंतर हल्लेखोराने लॉयन भागातील रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवून आणलाय. या हल्ल्यानंतर हल्लेखोर मेट्रोनं पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. गेल्या 24 तासांत फ्रान्समध्ये हा तिसरा हल्ला आहे.

कालच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या आजच्या हल्ल्याशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कालच्या हल्लेखोरांपैकी एक 18 वर्षांचा हल्लेखोर पोलिसांना शरण आला असला तरीही इतर दोन हल्लेखोर अद्याप फरार असल्याने त्यांनीही हा हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 पॅरीसमधील चार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये संपादकांची बैठक सुरू असताना दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात 12 जण ठार तर 20 जण जखमी झाले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये साप्ताहिकाचे मुख्य संपादक आणि व्यंगचित्रकार यांचाही समावेश आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पॅरीस शहरात तसेच संपूर्ण फ्रान्समध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतानाही गुरूवारी हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close