एसटी महामंडळाची निष्ठुरता, एक माऊली तान्हुल्यासह बजावतेय ड्युटी !

January 9, 2015 8:26 PM2 commentsViews:

akola_st_bus_newsकुंदन जाधव,अकोला

09 जानेवारी : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असं ब्रीदवाक्य मिरवणारं एसटी महामंडळ प्रत्यक्षात मात्र, आपल्याच महिला कर्मचार्‍यांविषयी किती असंवेदनशीलपणे वागतंय. याचा एक धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आलाय. एसटी महामंडळ बैठे काम देत नसल्याने एका महिला कंडक्टरला तब्बल 4 महिन्यांपासून आपल्या तान्हुल्याला कडेवर घेऊन ड्युटी करावी लागतेय.

या तान्हुल्याच्या झोळीची जागा खरंतर या माय माऊलीच्या घरात पाहिजे…पण एसटी महामंडळाची निष्ठूरता बघा….त्यांनी या महिला कंडक्टरला बैठे काम द्यायला स्पष्ट नकार दिला… आणि त्याचीच शिक्षा म्हणून हे तान्हुलं घराच्या अंगणात बागडायंच सोडून आईच्या कडेवरएसटीमधून सक्तीचा प्रवास करतंय. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा डेपोत कंडक्टर म्हणून काम करणार्‍या सुजाता इंगळेंना गेल्या चार महिन्यांपासून हा द्रविडी प्राणायम करावा लागतोय. एका हातात एसटीच्या घंटीची दोरी…आणि दुसरा हातात बाळाची झोळी.. अशी तारेवरची कसरत हिला करावी लागतेय.

सुजाताचे पती मुंबईत टॅक्सी ड्रायव्हर असल्यामुळे या बाळाला सांभाळायला घरी कुणीच नाहीये. म्हणूनच सुजाता इंगळेंनी वरिष्ठांकडे किमान सहा महिने बैठं काम द्या, अशी मागणी केली होती. एसटी महिला कर्मचारी संघटनेनंही त्यांना सहानुभूती दाखवली.

आम्ही या महिलेची तक्रार घेऊन डेपो मॅनेजरकडे गेलो तर त्यांनी सरळ..आपल्याकडे विनंती अर्ज केला तर नक्की विचार करू..एवढंच कोरडं आश्वासन दिलं.

बरं हे प्रकरण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना माहित नाही असं अजिबात नाही. आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी अक्षरशः झुरळासारखा हा विषय झटकून टाकला…आणि पीएला चौकशी करायला सांगितलीय, एवढीच त्रोटक प्रतिक्रिया दिली. मंत्रीच एवढे संवेदनशील असतील, तर एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांबद्दल न बोललेलच बरं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Purushottam Awate

    राज्य परिवहन मंडळाचा हा प्रकार खुपच धक्कादायक, दुर्दैवी

  • Pravin Patole

    Rajya pariwahan mahamndal evedhe nishthur ka aahe???

close