दिल्लीकरांना 24 तास वीज पुरवणार – नरेंद्र मोदी

January 10, 2015 3:39 PM0 commentsViews:

modi 5 sep speech

10  जानेवारी : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने रामलीला मैदानावर अभिनंदन रॅलीच्या निमित्ताने प्रचाराचे रणशिंग फुंकले. भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षातील अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी दिल्लीकरांवर अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला.

मोदींनी दिल्लीकरांना 24 तास वीज पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर 2022पर्यंत राज्यातील प्रत्येक झोपडीधारकाला पक्के घर देण्याच्या महत्त्वपूर्ण आश्वासनांचा त्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांवर घणाघाती टीकाही केली. सतत धरणे आणि आंदोलने करण्यात पटाईत असणार्‍यांनी ती खुशाल करावीत, असे सांगत त्यांनी आम आदमी पार्टीला (आप) लक्ष्य केले. मात्र, आम्ही प्रशासन हाताळण्यात पटाईत असून, दिल्लीतील जनतेने त्यासाठी आम्हाला मदत करावी असं आवाहन त्यांनी केले आहे.

 दिल्लीतील राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या एका वर्षापासून राज्याचा विकास रखडला आहे. ज्यांच्यामुळे ही अस्थिरता निर्माण झाली त्यांना दिल्लीकरांनी शिक्षा द्यावी आणि बहुमताने भाजपला सत्तेत आणावे, असे आवाहन मोदींनी यावेळी जनतेला केले. दिल्लीकरांना सध्या मोठ्या प्रमाणावर विजेची समस्या भेडसावत असून वीज मोठ्या प्रमाणावर महागली आहे. तेव्हा यापुढे स्वस्त दरात वीज पुरविणार्‍या सेवाधारकाशी नागिरकांना आपल्या मर्जीप्रमाणे करार करण्याची मुभा भाजप सरकारच्या काळात देण्यात येणार असल्याचेही मोदींनी म्हटले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close