रायगड जिल्ह्यातील 22 कुटुंबांवर गावकीचा बहिष्कार

January 11, 2015 11:49 AM0 commentsViews:

rajgad-roha

11 जानेवारी :  रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. रोहा तालुक्यातील डोंगरी गावात गावकीने विविध कारणांसाठी 22 कुटुंबांना वाळीत टाकले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे नोंदवली आहे.

रायगड जिल्ह्यात याआधीही जातपंचायतीची आणि गावकीने वाळीत टाकल्याची अनेक प्रकरण उघडकीस आलेली होती. सामाजिक बहिष्कार प्रकरणांचा मुद्दा मीडियाने उचलून धरल्यानंतर, जिल्हा प्रशासनाकडील तक्रारींचा ओघ वाढला आहे. पीडित कुटुंबांनीही गावकीच्या दहशतीला झुगारून तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

वाळीत कुटुंबांना गावच्या मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. किराणा मालाच्या दुकानातून सामान देण्यासही मनाई करण्यात आली आहे. नातेवाईकांना भेटण्याची आणि बोलण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. लग्न समारंभ किंवा मयत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली असल्याचं पीडित कुटुंबांनी सांगितले.

पीडित कुटुंबांनी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला होता. प्रशासन अधिकारी आता या गावकर्‍यांची भेट घेणार आहेत. गावकीच्या पंचांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या पीडित कुटुंबांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close