ऊस पेटला : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

January 12, 2015 2:05 PM0 commentsViews:

kol todfod Banner

12 जानेवारी :  साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील साखर संकुलात तोडफोड केली. कार्यकर्त्यांनी संकुलावर दगडफेक करत सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला असून या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदरावरून सरकारवर टीका करते आहे. आज (सोमवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलाजवळ ठिय्या आंदोलन सुरू होते. पण सरकार आणि साखर आयुक्त काहीच भूमिका घेत नाहीत, असं म्हणत आंदोलक हिंसक झाले. कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी थेट साखर संकुलात घुसून तोडफोड सुरु केली. संतप्त कार्यकर्त्यांनी संकुलातील एका वाहनाला पेटवून दिले. तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे गोळा होऊ लागला. पोलीस राजू शेट्टींशी बोलत असताना अस्वस्थ झालेल्या आंदोलकांनी तिथे उभ्या असलेल्या एका गाडीला आग लावली. त्यांनतर ताबडतोब पोलिसांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि हिंसा करणार्‍या शेतकर्‍यांना अटक केली.

आम्ही सत्तेत असलो तरी एफआरपीनुसार पैसे मिळत नाहीत, तोवर आंदोलन सुरूच ठेऊ, असा निर्धार मग राजू शेट्टींनी व्यक्त केला. राज्य सरकारने ऊसाला जर एफआरपी पेक्षा कमी दर दिला तर सत्तेवर लाथ मारायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गेली 15 वर्षं भ्रष्ट सरकारच्या विरोधात लढल्याचं त्यांनी सांगितले. ऊसदराच्या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आता शांत राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर आम्ही आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करत आहोत, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, अस आग्रह सरकारने धरला.दरम्यान, हा ऊसदाराचा प्रश्न सोडवण्यासाठी आता थेट केंद्र सरकारनेचं कारखानदारांना आर्थिक मदत करावी, असं म्हणत शरद पवारांनी बॉल मोदींच्या कोर्टात टाकलाय..

सध्याते साखरेचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे कारखान्यांना एफआरपीनुसार ऊसदर देणं व्यावहारिकदृष्ट्या आवाक्याबाहेरचं आहे. पण कारखानदार याच मुद्याचा बाऊ करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना साधा पहिला हप्ताही द्यायला तयार नाहीयेत. 70 दिवसांपासून उसाचा हंगाम सुरू झाला असला, तरी पैसे न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले.

राजू शेट्टींच्या पक्षाचा हा आक्रमकपणा प्रश्न धसास नेईपर्यंत टिकणंही तितकचं महत्वाचं आहे. कारण मध्येच फडणवीस सरकारने त्यांना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं तर आंदोलन कदाचित गुंडाळलंही जाऊ शकतं आणि ऊस ऊत्पादक शेतकरी पुन्हा वार्‍यावर सोडला जाईल, अशीही शक्यता आहे. विरोधात बसलेल्या काँग्रेसकडून या प्रश्नावर आंदोलन केलं जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण बहुतांश साखर कारखाने हे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचेच आहेत. म्हणूनच हा प्रश्न असाच चिघळत राहिला तर सहकारी साखर कारखानदारीच मोडीत निघण्याचा धोका संभवतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close