पत्नीने जीन्स घातली म्हणून एव्हरेस्टवीर वाळीत

January 16, 2015 9:48 AM0 commentsViews:

raigad vailit

16 जानेवारी : लग्नानंतर मुलीने जीन्स पॅन्ट घातल्याच्या कारणावरून रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथे एका दाम्पत्याला वाळीत टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारा राहुल येलंगे आणि त्याची वकील पत्नी यांना गावकर्‍यांनी वाळीत टाकल्याची तक्रार पोलादपूर तालुका वाळीत प्रकरण समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.

बदलत्या जीवनशैलीत महिलांनी जीन्स, टी-शर्ट घालणे तसे नवीन नाही आणि त्याबद्दल कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. राहुलने 2012मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करून गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले होते. पण लग्नानंतर जिन्स आणि टी-शर्ट घातल्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नीला वाळीत टाकण्यात आले आहे. राहुल येलंगे आणि पौर्णिमा यांनी आंतरजातीय विवाह केला. पुण्याचा झगमगाट सोडून त्यांनी गावात राहण्याचा निर्णय घेतला. पण गावकर्‍यांनी त्यांना वाळीत टाकून छळ सुरू केला आहे.

गावकर्‍यांच्या या छळामुळे पौर्णिमा हतबल झाली आहे. पौर्णिमा उच्चशिक्षित तर आहेच, शिवाय उत्तम गिर्यारोहकही. राहुलही शिकलेला तरुण आहे. 2012 साली त्याने एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. तत्कालीन राष्ट्रपतींकडून त्याचा गौरवही झाला.

राहुलच्या गोठ्याजवळ आता ग्रामस्थांनी होळी पेटवण्यास सुरुवात केली आहे. त्यात जर गोठ्याचे नुकसान झाले तर ती आमची जबाबदारी नाही, अशी मुजोरी काही ग्रामस्थांनी सुरू केली आहे. अजून तरी राहुलने पोलिसांमध्ये तक्रार केली नाही, पण त्याला आणि त्याच्या पत्नीला होणार्‍या त्रासाबद्दल तो आता बोलू लागला आहे. गावकीने वाळीत टाकल्याची तक्रार राहुलने पोलादपूर तालुका वाळीत प्रकरण समन्वय समितीच्या बैठकीत केली आहे. या बैठकीला पोलादपूरचे तहसीलदार आणि पोलीस इन्स्पेक्टरही उपस्थित होते. दरम्यान, आपण या दाम्पत्याला वाळीत टाकले नसल्याचे गावचे सरपंच राकेश उतेकर यांचे म्हणणे असून, याबाबत आपण शहानिशा करणार असल्याचे सांगितले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close