IBN लोकमत इम्पॅक्ट : लढवय्या सोनालीचं निलंबन रद्द

January 16, 2015 7:26 PM0 commentsViews:

thane_hostel_newsमनोज देवकर, ठाणे

16 जानेवारी : अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या सोनाली धादवाडच्या निलंबनाचे आदेश अखेर मागे घेतले गेले आहेत. तिच्या निलंबनाची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. त्याची दखल घेत आदिवासी विभागाने हे निलंबनाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत.

अन्यायाविरोधात दाद मागण्याची शिक्षा सोनाली धादवाडला भोगावी लागली. आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणार्‍या सोनालीनं तिथल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्च्याचं नेतृत्व केलं. पण या मागण्यांकडे प्रशासनानं लक्ष तर दिलं नाहीच, पण उलट तिला हॉस्टेल सोडावं लागेल, असंच सांगण्यात आलं. त्यासाठी तिला कारण देण्यात आलं ते उत्पन्नाच्या दाखल्यात तांत्रिक चुका असल्याचं…यामुळे मनस्ताप होऊन सोनालीने आत्मदहनाचा इशारा दिला.

ठाण्यातील कोपरी भागात एका खासगी बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल आहे. खरंतर याला हॉस्टेल का म्हणावं असा प्रश्न पडतोय. कोसळलेली स्लॅब, पडक्या भिंती, भयानक अवस्थेत असलेलं स्वयंपाक घर अशा या हॉस्टेलमध्ये जवळपास 65 मुली राहतायेत. याच सगळ्या दुर्दशेबाबत या मुलींनी आवाज उठवला. पण याबद्दल आम्ही वरिष्ठ पातळीवर कळवलं आहे. असं तोंडदेखलं उत्तर संबंधित अधिकार्‍यांनी दिलं.

सोनालीबद्दलचा हा प्रकार कळताच ठाण्याच्या कोपरी पोलिसांनी इथं धाव घेतली. मनसेनं आदिवासी विभागाच्या उपायुक्तांना घेराव घातला. या प्रकारानंतर सोनालीच्या निलंबनाचे आदेश मागे घेतले.

मोर्चात नेतृत्व केलं म्हणून सोनालीला शिक्षा मिळते, तर मग अन्यायविरोधात दाद मागायची तरी कशी, या प्रश्नाचं उत्तर मागायचं तरी कोणाकडे?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close