अतिरेकी कारवाया केल्या तर याद राखा; अमेरिकेची पाकिस्तानला तंबी

January 19, 2015 10:17 AM0 commentsViews:

obama to sharif

19 जानेवारी :   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याआधी अमेरिकेने पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौर्‍यादरम्यान दहशतवादी हल्ला किंवा सीमेवर घातपात होता कामा नये, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही सांगण्यात आले आहे.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. अमेरिका आणि भारत, दोन्ही देश ओबामा यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट काळजी घेत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्ताने ओबामा दिल्लीतील राजपथवर सुमारे दोन तास असतील. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे.

त्या पार्श्वभूमीवर, ओबामा भारतात आल्यानंतर, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाच्या कोणत्याही कारवाया करू नये किंवा तसे प्रयत्नही करू नयेत. पाकिस्तानने काही आगळीक केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कोणत्याही हल्ल्याचा माग काढला जाईल, असे पाकिस्तानला बजावण्यात आले आहे.

पाकिस्तानचा आजपर्यंतचा इतिहास पाहता, भारतात ज्यावेळी अमेरिकेचे महत्त्वाचे पाहुणे असतात, तेव्हा दहशतवादी कारवाया वाढतात. यापूर्वी 2000 साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौर्‍यावर असताना, पाकने जम्मू काश्मिरमध्ये हल्ले केले होते. तो इतिहास लक्षात घेऊनच अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे एक पथक पाकिस्तानला भेट देणार आहे. बंदी आणलेल्या दहशतवादी संघटनांवर काय कारवाई केली हे पाहण्यासाठी हे पथक पाकिस्तानात जात आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची वैशिष्ट्यं

– अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हजर राहणार
– यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी सव्वा लाख लोक येण्याची शक्यता
– दरवर्षीपेक्षा 25 हजार लोक जास्त येणार
– व्हीआयपींच्या बसण्याच्या ठिकाणी सातपदरी सुरक्षा कडं
– परेडचा संपूर्ण मार्ग सीसीटीव्ही कॅमेर्‌यानं कैद करणार
– फक्त राजपथवर 165 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close