बेदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीनाट्य

January 19, 2015 2:54 PM0 commentsViews:

bedi bjp cm candidates19 जानेवारी : किरण बेदी यांना भाजपमध्ये दाखल होऊन आठवडा पूर्ण होत नाही तोच वादंग निर्माण झालाय. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र किरण बेदी यांच्या नावाला भाजप काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे वाद निर्माण झालाय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे 20 दिवसांपेक्षा कमी दिवस उरले आहेत. आज (सोमवारी) संध्याकाळी भाजपच्या संसदीय पक्षाची दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून किरण बेदींच नाव घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा अणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य हजर राहणार आहेत. किरण बेदी यांचाच चेहरा घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्याचा भाजपनं निर्धार केलेला दिसतोय. मात्र, याबाबत दिल्ली भाजपच्या नेत्यामंध्ये नाराजी आहे.

किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रविवारी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी आपल्या घरी चहापानाचं आयोजन केलं होतं. बेदी यांच्या या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली तसंच या चहापानाला जाण्याचंही टाळलं. भाजपमध्ये सहभागी झालेल्या नव्या सदस्यांसोबत आम्ही जुळवून घ्यायचं ठरलं तर त्यांनीही आमच्यासोबत तसंच वागलं पाहिजे अशी प्रतिक्रिया तिवारी यांनी दिली.

तर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनाही बेदी यांनी चहापानासाठी बोलावलं होतं. मात्र, हर्षवर्धन हे 1 मिनिट उशिराने बेदींच्या घरी पोहचल्यामुळे बेदी यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, बेदींसोबत आपली फोनवर चर्चा झाली होती असा खुलासा हर्षवर्धन यांनी केला.

विशेष म्हणजे, आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी भाजपने किरण बेदी यांनी भाजपमध्ये सामिल करून घेतलं. बेदी यांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळेच भाजपच्या काही नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केलीये. या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न आज दिवसभरात भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून केला जाणार आहे असं समजतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close