किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार !

January 19, 2015 11:41 PM0 commentsViews:

kiran bedi cm candidates19 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खर्‍याअर्थाने रंगत आलीये. भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांच्या नावाची घोषणा केलीये. किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलं. किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता थेट आपचे नेते अरविंद केजरीवाल विरुद्ध किरण बेदी असा सामना पाहण्यास मिळणार आहे.

2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर पुन्हा होणार्‍या निवडणुकीत भाजपने पूर्ण खबरदारी घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली. आठ दिवसांपूर्वीच माजी आयपीएस अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातल्या सहकारी किरण बेदी यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. बेदींचा प्रवेश हा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणूनच झाला अशी चर्चा सुरू रंगली होती. अखेरीस आज यावर शिक्कामोर्तब झालंय. रात्री 8 च्या सुमारास नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत किरण बेदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय एकमताने मंजूर झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण बेदी यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता पूर्ण केली. किरण बेदींच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढणार असून त्यांच्या कर्तृत्वाचा आणि अनुभवाचा भाजपला नक्की फायदा होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. किरण बेदी या दिल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असंही शहा यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे, दिल्लीत आम आदमी पार्टीला टक्कर देण्यासाठी किरण बेदी यांचा प्रवेश हा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणूनच होणार असल्याची रणनिती भाजपने आखली होती. त्यानुसारच भाजप नेते अरूण जेटली यांनी बेदींशी संपर्क साधला आणि प्रवेशाची सोईस्कर पार पाडली. दुसरीकडे केजरीवाल यांच्या प्रचाराला सुरुवात होताच आज किरण बेदी यांची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळेच आता दिल्लीच्या आखाड्यात भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले दोन सहकारी आमने-सामने उभे ठाकले आहे.

भाजपचा आमदारांना व्हीप

किरण बेदी यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून चर्चा सुरू असताना भाजपच्या गोटात नाराजी पसरली होती. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी बेदींच्या नावाला विरोध केला होता. मात्र बेदी यांना पक्षांतर्गत विरोध होऊ नये, यासाठी भाजपनं व्हीप काढलाय. त्यामुळे तिवारी यांनी तलवारम्यान करत आपलं वक्तव्य मागे घेतलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close