‘बेस्ट’मध्ये 60 कोटींचा घोटाळा?

January 20, 2015 10:08 AM0 commentsViews:

प्रणाली कापसे, मुंबई.

20 जानेवारी : तुम्हाला एखाद्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही काय करता, त्या कंपनीची संपूर्ण माहिती काढता… किती व्याज मिळणार… मुळ रकमेचा परतावा कसा होणार? अशा प्रश्नाची उत्तर मिळाल्याशिवाय आपण एक रुपयाही गुंतवत नाही… पण कुठलीही बँक गॅरंटी नसलेल्या एका कंपनीत बेस्टने तब्बल 60 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आता हे 60 कोटी रुपये कुठे गेले याची चौकशी व्हावी यासाठी कर्मचारी संघटनांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतली बेस्ट ही एकेकाळी ‘आदर्श सिटी बस’ म्हणूण ओळखळी जायची. पण आता तिला घरघर लागली आहे. सतत तोट्यात असताना सुद्धा बेस्टने एक मोठी जोखीम पत्करली आणि 60 कोटी रुपयांचा तोटा करून घेतला. 2007-2008मध्ये मुंबईत सिटी बस चालवणार्‍या आणि मुंबई शहरात वीज पुरवणार्‍या बेस्ट प्रशासनाने कुठलीही चौकशी न करता ‘स्पार्क ग्रीन एनर्जी’ नावाच्या बँक गॅरंटी नसलेल्या कंपनीमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती खुद्द बेस्टच्या ऑडिट रिपोर्टमधून समोर आली आहे.

वीज क्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा, असे आदेश एमएआरसीईनी दिले होते. त्यानुसार बेस्टने जाहिरात काढली. त्यात अर्ज भरलेल्या स्पार्क ग्रीन कंपनीमध्ये आगाऊ अनामत रक्कम म्हणून बेस्टने 60 कोटी रुपये गुंतवले. त्यावेळी या कंपनीकडे फक्त जमीन होती, कुठलीही यंत्रसामग्री नव्हती.

– करारानुसार 2009 पासून ही कंपनी बेस्टला दरवर्षी ग्रीन एनर्जी देणार होती. पण आजपर्यंत या कंपनी कडून बेस्टला कुठल्याही प्रकारची वीज तर मिळालीच नाही, पण एक रुपयाचे व्याज ही मिळाले नाही.
– आता मुळ रक्कमेचं काय होणार असा प्रश्न निर्माण होतं आहे. विशेष म्हणजे स्पार्क ग्रीन कंपनी तयार होत असताना बेस्टचे महाव्यवस्थापक हे त्या कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य होते. पण आता मात्र त्यांनी आपलं नावं या संचालक मंडळातून काढून घेतल आहे.

 ‘बेस्ट’ घोटाळा?
– ‘बेस्ट’नं 2007-08 मध्ये ‘स्पार्क ग्रीन’ कंपनीत 60 कोटी रुपये गुंतवले
– कुठलीही बँक गॅरेंटी नसताना गुंतवणूक
– 2009 पासून ही कंपनी ‘बेस्ट’ला वीज देणार होती
– आजपर्यंत ‘बेस्ट’ला वीज मिळाली नाही
– व्याज स्वरूपात पैसेही मिळाले नाही

काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यावेळी शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बेस्टमध्ये आजवर कुठलाही घोटाळा झालेलाच नाही असं वक्तव्य केलं होतं. मग गेली 22 वर्ष बीएमसीत सत्तेत असणार्‍या शिवसेनेने या 60 कोटी रुपयांचं झालं तरी काय हे सांगावे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close