अखेर चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू

January 20, 2015 5:39 PM1 commentViews:

darubandi_chandarpur20 जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. वर्धा आणि गडचिरोलीपाठोपाठ आता चंद्रपूरमध्येही दारूबंदी करण्याचा निर्णय कॅबिनेटनं घेतला आहे. अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दारूबंदीसाठी आग्रही होते. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात आश्वासनंही दिलं होतं. अखेरीस मुनगंटीवार यांनी आपला शब्द पूर्ण करून दाखवलाय.

वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच दारुबंदी लागू आहे. गेली 5 वर्षे दारूपोटी हजारो संसार उद्धवस्त झाले. दारुबंदीसाठी चंद्रपूरमध्ये वारंवार आंदोलनंही झाली. एवढंच नाहीतर महिलांनी मुंडन करून आंदोलन केलं होतं. अखेर या महिलांच्या आंदोलनाला यश आलंय. चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू झालीये. दारूबंदी केली तर महसूलच्या बाबतीत किती नुकसान होईल, याचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर महसूल खातेही या दारूबंदीसाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, शासनाचा निर्णय योग्य असून त्यांचं अभिनंदन करण्यासारखा असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलंय. तसंच या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते हे बघणे महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर, दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू विकणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल आणि कारवाई करण्यासाठी नियमांमध्येही बदल करणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vishal

    निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते हे बघणे महत्त्वाचे !

close