बेस्टच्या तोट्यासाठी ‘बेस्ट’ अधिकारी जबाबदार?

January 21, 2015 10:12 AM0 commentsViews:


प्रणाली कापसे, मुंबई.

21  जानेवारी :  मुंबईकरांची लाडकी ‘बेस्ट’ आज सातत्याने तोट्यात आहे. अच्छे दिन..’ची वाट पाहणार्‍या मुंबईकरांवर बेस्ट भाडेवाढीनंतर आणखी बोजा पडणार आहे. बेस्ट प्रशासनाने चुकीच्या कंपनीत पैसे गुंतवून 60 कोटी वाया घालवले आणि आता बेस्टच्या अधिकार्‍यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून बेस्टचा पैसा लुबाडला आणि बेस्टला अडचणीत आणलं असल्याची माहिती IBN लोकमतला मिळाली आहे. जेव्हा कुंपणचं शेत खाऊ लागतं तेव्हा बेस्टला कोण वाचवणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

बेस्टच्या बसेस जशा गर्दीने ओव्हरफ्लो होतात तसेच बेस्टमध्ये अतिरिक्त स्टाफही ओव्हरफ्लो होत आहे. म्हणूनच काही अधिकार्‍यांना चक्क 5 वर्षांसाठी रजेवर जाण्याची मुभा दिली आहे. पण या रजेवर जाताना त्यांना बेस्टशी आर्थिक व्यवहार असलेल्या कंपनीत काम करता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती, मात्र असं असतानाही बेस्टच्या 2 अधिकार्‍यांनी नियम ढाब्यावर बसवत मोठी रजा घेतली आणि बेस्टच्या कंत्राटदार कंपन्यांमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यातील एक कायझन कंपनी. कायझन कंपनीने बेस्टला 700-800 कोटींचा गंडा घातला असल्याचा आरोप बेस्ट समितीत असलेल्या सुहास सामंतांनी केला आहे. हा सर्व प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे.

 • माहितीच्या अधिकारात उघड झालेल्या बाबीनुसार बेस्टनं कायझनला स्मार्ट कार्ड आणि पासेस तयार करण्याची कंत्राटं दिली
 • बेस्टने करार करताना अनामत रक्कमही घेतली नाही
 • 2006 साली स्थापन झालेल्या या नवख्या कंपनीला बेस्टने 2007 साली कंत्राट दिले
 • कायझनसोबत करार होण्याच्या 2 महिने आधीच कामाला सुरुवात झाली होती
 • 3 वर्षं कायझनने हे काम केल्यानंतर बेस्टला फायद्याऐवजी तोटा झाल्याचं उघड झाले
 • 2010 साली सुहास सामंतांनी हा गैरप्रकार बेस्ट समितीपुढे मांडला आणि चौकशीची मागणी केली
 • त्यानंतर लगेच नव्या महाव्यवस्थापकांनी या योजनेचे काम थांबवले
 • कायझनने पुढे बँकेत नेमके पैसे गोळा करण्यात टाळाटाळ केली, असाही आरोप आता होत आहे
 • त्यामुळे हा घोटाळा नेमका किती कोटी रुपयांचा आहे, हे कळू शकत नाही, असं तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे

बेस्टच्या सुरक्षा अहवालात कायझन कंपनीला हा घोटाळा करण्यात बेस्टच्याच अधिकार्‍यांनी मदत केल्याचं उघड झाल आहे. या अहवालात बेस्टच्या एका महिला अधिकार्‍यासह पाच वरिष्ठ अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

या अहवालानुसार, बेस्टचे 2 अधिकारी कायझनला कंत्राट दिल्यानंतर काही महिन्यातच पाच वर्षांच्या रजेवर गेले. हे दोन्ही अधिकारी एकाच दिवशी रजेवर गेले आणि एकाच दिवशी बेस्टशी करार केलेल्या वेगवेगळ्या कंपनीवर नियमबाह्य पद्धतीने रुजू झाले. मग या दोघांनी मिळून तनिष्क नावाची एक बोगस कंपनी स्थापन करून कायझन कंपनीला पासच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवत असल्याचं दाखवलं, पण प्रत्यक्षात न मनुष्यबळ पुरवले गेले, ना पासचे पैसे ग्राहकांना परत मिळाले. या सगळ्यात बेस्टच्या कोट्यवधी रुपयांचे मात्र नुकसानच झाले.

हा अहवाल जरी सादर झाला असला तरी त्यात दोषी अढळलेल्या अधिकार्‍यांवर आणि कायझनवर ना कोणता एफआयआर दखल करण्यात आला ना कोणती कारवाई झाली. इतकंच नाही तर 2014 पर्यंत या अधिकार्‍यांवर बेस्टने त्यांच्या अंतर्गतसुद्धा कोणातीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे हे अधिकारी आज ही बेस्टमध्येच काम करत आहेत.

बेस्ट कायझन घोटाळा

 • कायझनसोबत कराराच्या 2 महिने आधीच कामाला सुरुवात
 • 3 वर्षांनंतर बेस्टला फायद्याऐवजी तोटा झाल्याचं उघड
 • 2010मध्ये गैरप्रकार बेस्ट समितीपुढे मांडण्यात आला, चौकशीची मागणी
 • त्यानंतर नव्या महाव्यवस्थापकांनी काम थांबवलं
 • कायझनकडून नंतर बँकेत नेमके पैसे गोळा करण्यात टाळाटाळ
 • हा घोटाळा नेमका किती कोटी रुपयांचा आहे, हे कळणं अवघड

बेस्टचा सुरक्षा अहवाल

 • बेस्टचे 2 अधिकारी कायझनला कंत्राट दिल्यानंतर पाच वर्षांच्या रजेवर
 • दोघेही एकाच दिवशी रजेवर
 • बेस्टशी करार केलेल्या वेगवेगळ्या कंपनीकडे रुजू
 • दोघांकडून तनिष्क या बोगस कंपनीची स्थापना
 • कायझनला पाससाठी मनुष्यबळ पुरवत असल्याचं दाखवलं
 • प्रत्यक्षात मनुष्यबळ पुरवलं गेलं नाही
 • ग्राहकांना पासचे पैसे परत मिळाले नाहीत
 • बेस्टचं मात्र कोट्यवधींचं नुकसान

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close