‘महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्यासाठी सरकारने केला छुपा करार’

January 21, 2015 7:29 PM0 commentsViews:

vikhe on cm21 जानेवारी : गोदावरी खोर्‍यातलं पाणी गुजरातला पळवण्यासंदर्भात राज्य सरकारने छुपाकरार केलाय, असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. हा करार लवकरात लवकर पूर्ण करून दमणगंगा आणि नार-पार खोर्‍यातला नदीजोड प्रकल्प मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी केंद्र सरकार राज्यावर दबाव टाकत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला प्रकल्प पळवून नेत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारसभातून केला होता. पण आता महाराष्ट्राचं पाणीचं गुजरातला पळवून नेण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. गोदावरी खोर्‍यातलं पाणीच गुजरातला देण्यासंदर्भात राज्य सरकारनं छुपा करार केलाय. महाराष्ट्र आणि गुजरातमधला पाणीवाटपाचा हा करार राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी जनतेसमोर उघड करावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली आहे. हा करार अंमलात आला तर राज्याच्या पाणी प्रश्नावर दूरगामी परिणाम होईल. आधीच गोदावरी खोर्‍यात पाण्याची तूट असताना राज्याचं पाणी गुजरातला पळवणं हा राज्यावर अन्याय असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. यासंदर्भात विखे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांसमोर पुराव्यानिशी एक सादरीकरणही केले. दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विखे पाटलांचा आरोप फेटाळून लावलाय. दमणगंगा – पिंजाळ प्रकल्पाचं पाणी गुजरातला जाणार नाही. राज्याच्या वाट्याचं पूर्ण पाणी मिळणार आहे. गुजरातला जास्तीचा एक थेंबही पाणी दिलं जाणार नाही. विरोधकांचे सर्व आरोप खोटे आहेत असं प्रत्युत्तर महाजन यांनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close