मोदींच्या ‘मन की बात’ला ओबामांची साथ

January 22, 2015 10:58 AM0 commentsViews:

modi-obama_650x400_51421831873

22 जानेवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतीय नागरिकांशी संयुक्तपणे ऑल इंडिया रेडियोवरून संवाद साधणार आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही सहभागी होणार आहेत. येत्या 27 जानेवारीला ‘मन की बात, साथ साथ’ हा विशेष कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बराक ओबामा 25 तारखेपासून भारतभेटीवर येत आहेत.

ओबामा हे येत्या प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दौर्‍यानिमित्त भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी ओबामा मोदींसोबत रेडिओवरून देशवासीयांशी थेट संवाद साधणार आहेत. स्वत: मोदी यांनी ट्विटद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे.

यंदाचा ‘मन की बात’ कार्यक्रम हा विशेष असणार आहे. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मी आमचे विचार एकत्रितरित्या मांडणार आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना या दोन्ही नेत्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकीयमधून संयुक्तपणे संवाद साधला होता. उभय देशांमधील संबंधांना 21व्या शतकात नवा आयाम देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी ‘मन की बात’ कार्यक्रमातून सातत्याने संवाद साधत आहेत तर अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षांनी नागरिकांशी रेडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याची परंपरा आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close