सोमदेव देवबर्मन आणि सानिया मिर्झाचा यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश

September 1, 2009 8:38 AM0 commentsViews:

1 सप्टेंबर भारताच्या सोमदेव देवबर्मनने यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली आहे. आपल्या पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळणार्‍या सोमदेवनं पोलंडच्या प्रतिस्पर्ध्याचा 6-3, 6-4, 6-3 अशा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. लिएंडर पेसनंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकेरीत भारतीय टेनिसपटूनं दुसरी फेरी गाठण्याची किमया आत्तापर्यंत कोणीही केली नव्हती. पण सोमदेवने पेसच्या कामगिरीची बरोबरी केली आहे. आता दुसर्‍या फेरीत सोमदेवची गाठ पडेल ती 23व्या सीडेड फिलीप कोहेल श्रीबरशी. तर महिला गटात सानिया मिर्झानंही यूएस ओपनमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीमध्ये तिने रशियाच्या ओल्गा गोव्होर्टसोव्हाचा 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. आपल्या तुफान फोरहँडचा वापर करत सानियानं पहिला सेट अगदी आरामात जिंकला, पण दुसर्‍या सेटमध्ये 20 वर्षीय ओल्गाने आपला सर्वोत्तम खेळ करत सेट आपल्या नावावर केला. तिसर्‍या सेटमध्ये सानियाने ओल्गाची सर्व्हिस भेदत सेटमध्ये आघाडी घेतली आणि मॅच आपल्या नावावर केली. आता सानियाचा दुसर्‍या राऊंडमध्ये मुकाबला असेल तो वर्ल्ड नंबर 10 फ्लॅव्हिआ पेनेट्टाशी.

close