फिल्म रिव्ह्यु : न पचणारं ‘बाळकडू’ !

January 23, 2015 7:39 PM3 commentsViews:

 

अमोल परचुरे, समीक्षक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून ‘बाळकडू’ हा मराठी सिनेमा रिलीज झालाय. या ‘बाळकडू’मध्ये बाळासाहेब नाहीत तर त्यांचे विचार आहेत, त्यांचा आवाज आहे. या आवाजाला प्रचंड शिट्‌ट्या आणि टाळ्या मिळतील यात काही शंकाच नाही, पण बाळासाहेब मोठे होते म्हणून सिनेमाही तितकाच चांगला असेल अशी अपेक्षा मात्र ठेवू नका, नाहीतर तुमचा अपेक्षाभंग होईल. ‘बाळकडू’ या सिनेमाचा लूक चांगला आहे, कलाकार चांगले आहेत पण याच्या जोडीला जी ताकदवान पटकथा लागते तीच सिनेमात मिसिंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा जेवढा जोरदार होता तेवढेच त्यांचे टीकाकारही होते. या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याची संधी या सिनेमाने गमावलीये. शिवसेना म्हणजे बंद आणि राडा करणारी संघटना अशी जाणीवपूर्वक ओळख ज्यांनी निर्माण केली होती दुर्देवाने त्यांनाच बळ देण्याचं काम या सिनेमाने केलंय. म्हणूनच हा सिनेमा म्हणजे बाळासाहेबांना वाढदिवसाची भेट आहे की, आणखी काही असा संशय यायला लागतो. ‘मी, शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सारख्या सिनेमात मराठींवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध काही उपाय दाखवलेले होते, इथे तसं काहीच होत नाही. ‘बाळकडू’मध्ये तोडफोड, हाणामारी करुनच न्याय मिळेल असा समाजाच्या दृष्टीने गंभीर ठरेल असा विचार मांडण्यात आलाय.

काय आहे स्टोरी ?

balkadu344242थोडक्यात कथा सांगायची तर, बाळकृष्ण पाटील या सामान्य मराठी माणसाला ऐतिहासिक व्यक्तींचे आवाज ऐकू येतात, ‘लगे रहो मुन्नाभाई’ किंवा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा सिनेमात आपण जे बघितलं होतं तसाच काहीसा केमिकल लोचा या बाळकृष्णचा झालेला आहे. हळूहळू इतर आवाज नाहीसे होतात आणि उरतो केवळ बाळासाहेबांचा आवाज… हाच आवाज मग त्याला प्रेरणा देतो आणि मग हा बाळकृष्ण मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध उभा ठाकतो. आता कथेमध्ये तर खूप दम आहे, पण या चमकदार कथेवर जी पटकथा फुलवण्यात आलीये ती अगदीच कमजोर झालेली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आजही कशी गरज आहे हे दाखवताना खूप चुकीचा संदेश दिला गेलाय. बांद्र्यात महाग फ्लॅट विकतो म्हणून त्या बिल्डरच्या कानाखाली आवाज काढणं यासारख्या गोष्टीतून बाळासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची चुकीची प्रतिमा तयार होईल याचं भान ठेवणं गरजेचं होतं. प्रचारकी थाटाचा सिनेमा असण्यातही काही वावगं नाही, पण त्यातल्या विसंगतींमुळे सामान्य प्रेक्षकांबरोबरच कट्टर शिवसैनिकांच्या मनाचाही गोंधळ उडू शकतो ही एक खूप चिंताजनक गोष्ट आहे.

थोडक्यात…

balkadu52मराठी माणूस मुंबई सोडून लांब निघालाय, मराठी माणूस व्यवसाय करण्यात कमी पडतो, मराठी माणूस एकत्र येत नाही असे वर्षानुवर्ष आपण ऐकतोय, सिनेमातही याचा उल्लेख येतो, पण त्याचं पुढे काही घडत नाही, उलट सिनेमात बहुसंख्य मराठी माणसांच्या मनातल्या न्यूनगंडाचा बाऊ करण्यात आलेला आहे, जे धक्कादायक आहेच आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या अगदी उलटही आहे.

परफॉर्मन्स

balkadu3434234आवर्जून उल्लेख करावा अशा सिनेमातल्या गोष्टी म्हणजे उमेश कामतचा दमदार अभिनय आणि चेतन शशीतल या अवलिया व्हॉईस आर्टिस्टने काढलेला बाळासाहेबांचा आवाज…आत्मविश्वास गमावलेला बाळकृष्ण ते बाळासाहेबांच्या विचारांनी पेटून उठलेला बाळकृष्ण हा प्रवास उमेशने उत्तमच साकारलाय. चेतन शशीतल यांनी बाळासाहेबांचा हुबेहूब आवाज काढून जी किमया साधलीये त्याला खरंच तोड नाही. खलनायकाची व्यक्तिरेखा लिखाणात टोकदार नसूनही प्रसाद ओकने चांगली बॅटिंग केलीये. एकंदरित, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकायचे असतील तर त्यांच्या खर्‍या आवाजातली भाषणं ऑडिओ-व्हिडिओ स्वरुपात सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे बाळकडू बघून डोक्याचा गोंधळ करण्यापेक्षा ही भाषणं ऐकणं जास्त येाग्य ठरेल.

रेटिंग 100 पैकी 50

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • sudarshan

  what

 • Avinash Badgujar

  Ithe mandalay tase kahi nahi. Film was very nice. We enjoyed

 • Himani Ranade

  Mala cinema avadla.
  Umesh kamat ne kharch saglyan madhla marathi manus tithe sadar kela ahe …..! khup chan kam kela ahe …! Ek vel jevun rahin pan mumbai sodnar nahi. kinva charbi nahire MAAj asha kahi dialouges mule kharch khup bara vatla kinva aplyala nkki kay karaycha ahe samjla…….!Shala vachvanyasathi che praytna ani shevtachi mulakhat hi khuup ch chan pane sadar keli ahe …… !
  Tasach ‘SAHEB’ SONG ANI powada hi khup chan ahe ….!

close