गारपीटग्रस्तांची मदत कुठे ?, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हवेतच विरलं

January 24, 2015 2:06 PM0 commentsViews:

cm in nasikदीप्ती राऊत, नाशिक

24 जानेवारी : ‘भरपाई जाहीर झालीये 25 हजारांची आणि किटकनाशकाची उधारी द्यायची आहे 4 लाखांची…’ ही अवस्था आहे नाशिकमधल्या द्राक्ष बागायतदारांची. गेल्या महिन्यातल्या गारपिटीनं द्राक्ष उत्पादकांना झोडपलं. नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी तातडीने नाशिकला भेटही दिली. सभागृहात नुकसान भरपाईची घोषणाही केली. पण प्रत्यक्षात काय झालं? पॅकेज कुठे आहे?, याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट

वडनेर भैरव गावातल्या निवृत्ती तिडकेंच्या याच बागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली होती. 8 लाखांचं कर्ज काढून दोन वर्षांत उभा केलेली बाग. 10 लाखांचा माल तर नक्कीच निघाला असता. पण अर्ध्या तासाची गारपीट झाली आणि पूर्ण बागेत कोवळ्या द्राक्षांची पखरण पसरली. निवृत्तीदादांच्या ओट्यावर बसूनच मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचं सांत्वन केलं. त्यांच्या नुकसानीचा सहानुभुतीपूर्वक विचार केला जाईल असं आश्वासन दिलं होतं. 25 हजार रुपये हेक्टरी मदतीची घोषणाही सभागृहात केली. पण ती मदत
लाल फितीमध्येच अडकून पडलीये.

काहीच मिळालं नाही अजून…माझं 8 लाखांचं नुकसान झालं..फक्त पंचनामे झाले अशी व्यथा निवृत्ती तिडके यांनी मांडली.

‘सगळे आले तेव्हा, मंत्री आले, आमदार आले, खासदार आले. पण आम्हाला अजून काहीच मिळालं नाही. औषधांचे पैसे द्यायचेत. काय द्यावं आणि काय खावं…’ असा सवालाच निवृत्ती तिडके यांच्या पत्नीने विचारलाय.

द्राक्षासारखं बागायती पिकानं नाशिक जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना सधन केलं. पण गेल्या 4 वर्ष सातत्यानं होणार्‍या गारपिटीने त्यांचं अर्थकारणच बिनसलंय. द्राक्ष बागांसाठी हेक्टरी खर्च 4 लाखांचं, दोन वर्षांचं कर्ज 8 लाख. त्यातून 1 लाख मजुरीचे, 2 लाख औषधांचे..अडीअडचण, आजारपण हे दूरच…

“मला हृदयविकाराचा त्रास आहे. 10 लाखांचं कर्ज आहे. आतापर्यंत 5 लाख उपचारांवर खर्च झालेत. मुख्यमंत्री आले तेव्हा खूप दिलासा मिळाला होता. पण हाती काहीच पडलं नाही…” असं अरूण तिडके सांगाताय.

जवळपास पंचक्रोशीतल्या सर्वच शेतकर्‍यांचं हेच म्हणणं आहे. याच वडनेर भैरवच्या शेतकर्‍यांनी मुंबई-आग्रा महामार्ग अडवला तेव्हा सरकारला जाग आली. शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच आली. एकंदरीतच पाहणी दौरे, आश्वासनं आणि घोषणा…प्रत्यक्ष भरपायीचा पत्ताच नाही..
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close