राष्ट्रवादीशी चर्चा करायला काँग्रेस तयार

September 2, 2009 6:57 AM0 commentsViews: 2

2 सप्टेंबरविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते तयार झाले आहेत. पण काँग्रेस किती जास्त जागा मागते आणि त्यातल्या किती जागा द्यायला राष्ट्रवादी तयार होते त्यावरच आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. मंगळवारी सकाळी राज्य काँग्रेसचे प्रभारी ए.के.अँटनी यांनी सोनिया गांधींना भेटून आपला अहवाल सादर केला. त्यात त्यांनी आघाडी करण्याविषयी अनुकुलता दाखवली असली तरी राज्यातल्या कित्येक नेत्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचाही शेरा मारला आहे. सोनिया गांधींना भेटल्यानंतर अँटनींनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीशी आघाडी करायची की नाही याबाबत सविस्तर चर्चा झाली. 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांचा जागावाटप फॉर्म्युला पूर्णत: अमान्य करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जागावाटपाची चर्चा करताना आक्रमकपणे राष्ट्रवादीकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न राहील, राष्ट्रवादीनं जास्त जागांची मागणी मान्य केली तरच आघाडी करायची, अशी भूमिका नेत्यांनी घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती नेमकी उलट आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेएवढं यश न मिळाल्यानं राष्ट्रवादी यंदा स्वबळावर लढण्याची भाषा करत नाही. आघाडी होणं हे राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसच्याही हिताचं आहे, असं शरद पवारांपासून ते आर.आर.पाटील आणि तारीक अन्वरपर्यंत सर्वच नेते पटवून सांगत आहेत.

close