भुखंडाचे श्रीखंड, बेस्टचे 170 भूखंड बिल्डरांच्या घश्यात ?

January 24, 2015 6:54 PM0 commentsViews:

best_scamप्रणाली कापसे,मुंबई

24 जानेवारी : ‘बेस्ट’च्या घोटाळ्यांच्या मालिकेत स्पार्क ग्रीन, कायझन घोटाळा दाखवल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, बेस्टच्या अधिकार्‍यांनी केलेला तिसरा मोठा घोटाळा…हा आहे सब-स्टेशन घोटाळा. सन 2006 ते 2010 या वर्षात बेस्टचे अधिकार्‍यांनी बिल्डरांवर दया दाखवत बेस्टला मिळू शकणारे एक नाही दोन नाही तर तब्बल 170 भूखंड दान करुन टाकले. आणि इथेच जन्म झाला कोट्यवधी रुपयांचा घोटाळयाचा…

मुंबईत ज्या महाकाय इमारती उभ्या राहात आहेत, त्यांना विजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी बेस्टची आहे. विकास करत असताना नियमांनुसार अशा इमारतीमध्ये वीजेसाठी सब स्टेशन बांधून देणं हे बिल्डरांवर बंधनकारक आहे. पण उपलब्ध जागेमध्ये बेस्टसाठी सब-स्टेशन बांधलं तर विकासकाचं नुकसान होतं. सोबतच सब स्टेशन बांधण्याचा खर्च त्यांच्या माथी पडतो. म्हणून बहुतेक विकासक हे बेस्टला तुमचं सब-स्टेशन इथून हलवा अशी विनंती करतात. आणि बेस्ट या इमारतीमधली ही कोट्यावधीची जागा बिल्डरांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन सोडून देते.

बेस्ट सबस्टेशन घोटाळा

- 2006 ते 2010 या काळात बेस्टने 138 बिल्डर्सना सब-स्टेशनची जागा सोडण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलं
- म्हणजेच बेस्टनं सब-स्टेशनसाठी मिळणारे 138 भूखंड सोडून दिले
- त्याच बरोबर बेस्टनं स्वतःच्या मालकीच्या 32 भूखंडांवर सब स्टेशनची गरज नाही, असं सांगत त्या जागा निकाली काढल्या
- या एकूण 170 जागा एक रुपयाही न घेता सोडून दिल्यामुळे बेस्टचं आणि मुंबईकरांचं मोठं नुकसान झालं

वीजेचं सब स्टेशन हे पाच हजार स्वेअर फुटवरच्या प्रत्येक इमारतीमध्ये असावं असा राज्य सरकारचा नियम आहे. पण बिल्डरांनी हे सब
स्टेशन बांधले नाही. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा जीव धोक्यात आलेत. कारण इमारतीला आग लागली तर जीव वाचवण्यापुरती ही वीज मिळू शकणार नाही.

सब स्टेशन न बांधल्यामुळे विजेचा दाब कमी जास्त होणं, बिल जास्त येणं आणि उपकरणांना आग लागणं असे प्रकार वारंवार घडतात.
बेस्टच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कुठल्या फायद्यासाठी या जागांवर पाणी सोडलं, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाहीये. या विषयावर बोलायला बेस्ट प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी नकार दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close