महाराष्ट्रातील 20 शूरवीरांचा सन्मान

January 26, 2015 9:35 AM0 commentsViews:

ashok chakra
26 जानेवारी : लष्करातील नायक नीरज कुमार सिंह आणि राष्ट्रीय रायफल्सच्या 44 व्या बटालियनचे मेजर मुकुंद वरदराजन यांना यावर्षीचा ‘अशोक चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात लढा देताना वीरमरण पत्करणार्‍या या दोघांना देशातील या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  असून महाराष्ट्राच्या  पोलिस विभागाने यंदा तब्बल ६८ पदकांची लयलूट करत बाजी मारली आहे.

सर्वोच्च शौर्य पुरस्कार मानले जाणारे अशोक चक्र नाईक नीरज कुमार सिंग यांना मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांनी जम्मू- काश्मीरमधील अतिरेक्यांशी शौर्याने लढताना देशासाठी प्राणार्पण केले. त्याचप्रमाणे मेजर मुकुंद वरदराजन यांनी गेल्या वर्षी 25 एप्रिल रोजी काश्मीरच्या शोपियॉ जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांशी लढताना अभूतपूर्व वीरतेचे दर्शन घडविले होते. यात ते शहीद झाले. यासाठी त्यांचाही अशोक चक्रने मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे.

यावर्षी अशोक चक्रसोबतच तिघांना कीर्ती चक्र आणि अन्य 12 जणांना शौर्य चक्र पुरस्कार देण्याचं जाहीर करण्यात आला आहे. शौर्य चक्र विजेत्यांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर खोऱ्यातील निवडणूक सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेले लेफ्टनंट जनरल संकल्प कुमार यांचा समावेश आहे.

66 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 374 शौर्य आणि अन्य संरक्षण पुरस्कार जाहीर केले आहेत. शौर्य, उल्लेखनीय  कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी अशा तीन विभागात पोलिस कर्मचारी-अधिकारी यांना पदके जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान, महाराष्ट्राच्या पोलिस विभागाला यंदा एक राष्ट्रपती शौर्य पदक, 19 पोलिस शौर्य पदके, 5 उल्लेखनीय  कामगिरी राष्ट्रपती पदके आणि 43 गुणवत्तापूर्ण कामगिरीची पोलिस पदके अशी एकंदर 68 पदकांची लयलूट करत  राज्याचे नाव देशात अग्रक्रमावर झळकावले आहे.

माओवाद्याच्या विरोधात जीवाची पर्वा न करता बेधडकपणे लढणाऱ्या आणि शहीद झालेल्या अशा गडचिरोली जिल्ह्यातल्या 13 जणांना राष्ट्रपती पदक आणि पोलीस शौर्य पदक जाहीर झाल आहे. गडचिरोली आणि गोंदीया हे जिल्हे मिळून एकुण 20 जणांना शौर्य पदक जाहीर करण्यात आलं आहे. देशात सर्वाधिक पोलीस शौर्यपदके  मिळवणारा गडचिरोली हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. राष्ट्रपती शौर्य पुरस्कार शहीद हवालदार गणपत मडावी यांना जाहीर झालं आहे. तर गडचिरोलीमध्ये पोलीस अधीक्षक असताना केलेल्या कामाबद्दल सध्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनाही शौर्यपदक जाहीर झालं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close