आता थेट करा सरकारकडे तक्रार, ‘आपले सरकार’ ऍप लाँच

January 26, 2015 4:09 PM0 commentsViews:

apale sarkar23426 जानेवारी : लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी फडणवीस सरकारने ‘आपले सरकार’ नावाचं वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप आज (सोमवारी) लाँच केलंय. या वेब पोर्टलच्या माध्यमातून 21 दिवसांच्या आत लोकांच्या तक्रारीचं निराकरण केलं जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. माहिती अधिकाराचा कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून सामान्यांना कालबद्ध सेवा देण्यासाठी `सेवा हमी विधेयक` आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

आपल्या तक्रारी शासनाकडे मांडण्याकरिता किंवा शासनाचे कामकाज, धोरणासंबधी जनतेला सूचना आणि अभिप्राय देण्याकरिता 100 दिवसात वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात येईल, या जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता करीत प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आपले सरकार’ वेबपोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या समारंभास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव अजोय मेहता, संचालक सुर्यकांत जाधव यावेळी उपस्थित होते. आधी मंत्रालय त्यानंतर जिल्हा, महापालिका आणि तहसील कार्यक्षेत्र वेब पोर्टल अंतर्गत येणार आहे. या वेब पोर्टलचं अनावरण करताना आपलं सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. हे वर्ष राज्य सरकार डिजीटल वर्ष म्हणून साजरं करणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close