बाय बाय ओबामा…

January 27, 2015 4:41 PM0 commentsViews:

obama433427 जानेवारी :‘…ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं…’असंच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबत म्हणावं लागले. भारतीयांची मनं जिंकून ओबामांनी ‘नमस्ते’ म्हणत निरोप घेतला. ओबामा यांचा तीन दिवसांचा भारत दौरा आज संपला. दौरा आटोपून ओबामा दिल्लीतल्या पालम एअरपोर्टवरून दुपारी दोन वाजता सौदी अरेबियाला रवाना झाले. एअरपोर्टवर त्यांनी भारताने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. जाताना त्यांनी सर्वांना नमस्तेही केला. मात्र, ओबामांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एअरपोर्टवर जाणार होते. पण, ते गेले नाही. त्यांच्याऐवजी वरिष्ठ भारतीय अधिकारी त्यांना निरोप देण्यासाठी एअरपोर्टवर उपस्थित होते.

दरम्यान, बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याची सांगता दिल्लीतल्या सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये विद्यार्थ्यांशी संवादाने झाली. या भाषणासाठी जवळपास 2 हजार जण उपस्थित होते. जवळपास अर्धा तास ओबामांचं दिलखुलास भाषण झालं. आपल्या भाषणात त्यांनी वर्णभेद, धर्मभेद, स्त्री सक्षमीकरण, शिक्षण आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक विषयांना हात घातला. सर्वसमावेशक विकास, महिलांची सुरक्षा आणि त्यांना सन्मानाने वागवणं, भारत आणि अमेरिकेतले समान दुवे हे यातले प्रमुख मुद्दे आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमचं स्थान मिळावं, यासाठी अमेरिका आग्रही आहे, असं आश्वासनही ओबामांनी दिलं. तर दुसरीकडे, प्रगती हवी असेल तर धार्मिक तेढ निर्माण करून चालणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. एखाद्या देशाला प्रगती करायची असेल, तर त्या देशातल्या महिलांची प्रगती झाल्याशिवाय आणि त्यांचा सन्मान केल्याशियाव ते शक्य नाही, असं परखड मत ओबामांनी मांडलं. माझी पत्नी मिशेल माझ्यावर टीकाही करते आणि असं अनेक वेळा होतं, असं म्हटल्यावर प्रेक्षकांमधून टाळ्यांचा गडगडात झाला. आपल्या भाषणात त्यांनी भारताचं तोंडभरून कौतुक केलं, आणि भारताच्या विकासात अमेरका जास्तीत जास्त भाग घेऊ इच्छिते, असं ते म्हणाले.

ओबामांची फटकेबाजी

सर्वात शक्तीशाली अशा राष्ट्राचे अध्यक्ष बराक ओबामांची यावेळी वेगळी झलक पाहण्यास मिळाली. ओबामांनी आपल्या भाषणात हिंदी चित्रपटातील डायलॉग म्हणत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ओबामा यांनी सर्वांना ‘नमस्ते’ केला. गेल्यावेळी भारत भेटीवर आलो, त्यावेळी इथल्या काही कार्यक्रमांमध्ये मी आणि मिशेल यांनी नाचण्याचाही आनंद घेतला होता, अशी आठवण सांगून ओबामा म्हणाले, यावेळी तशी संधी मिळाली नाही. ‘सॅनोरिटा, बडे बडे देशों में…’मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेलच, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच टाळ्या आणि हश्या पिकल्या. तसंच ओबामांनी आपल्या भाषणात अभिनेता शाहरुख खान, मिल्खा सिंग आणि मेरी कॉम यांचा उल्लेख ही केला.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बुलेटवरून केलेल्या चित्तथरारक कसरती आपल्याला विशेष आवडल्याचे ओबामा म्हणाले. त्याचवेळी बुलेटवरून फिरण्याची माझी इच्छा आहे. मात्र, आपली सुरक्षायंत्रणा त्याला परवानगी देणार नाही, पण मी तसं काही करणार नाही असंही ओबामा म्हणाले.

भारताला दोन व्यक्तींमुळे जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे. ते म्हणजे महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद. गांधीजी लोकांसाठी झगडत राहिले. मार्टिन ल्यूथर किंग यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. तर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत माझ्याच शिकागोमध्ये, माझ्या बंधु भगिनींनो म्हटले होते. आज मी भारतात म्हणू इच्छितो, माझ्या बंधू भगिनींनो…असं म्हटल्यावर प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा कडकड केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close