लक्ष्मण रेषा !!!

January 27, 2015 7:39 PM0 commentsViews:

mahesh_mhatre_ibnlokmat - महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत

एकदा शहेनशाह अकबर आपल्या दरबारात बसलेले असतात. अचानक त्यांना एक कल्पना सुचते. ते टाळी वाजवतात, सेवक धावत पुढे होतात, बादशाह सांगतात, “एक कागज और कलम लेके आवो”. कागद आणि लेखणी आणली जाते. बादशाह त्या कागदावर एक मोठी रेषा काढतात आणि सेवकाला तो कागद सगळ्या दरबारापुढे धरायला सांगतात, तो तसे करतो. बादशाह सगळ्यांना विचारतात, ‘तुम्हाला काय दिसतंय?’ सगळे एकमुखाने ओरडतात, ‘एक रेषा’. त्यावर बादशाह अकबर म्हणतात, बरोबर, आता तुम्ही ही रेषा तिला स्पर्श न करता मोठी करा, सांगा कोण करू शकतो?’ बादशाहाने टाकलेल्या त्या कोड्याने सारे दरबारी लोक बुचकळ्यात पडतात.

बादशाहाचे कोडे सोडवायला कोणीही समोर येत नाही. बराच वेळ शांततेत जातो, मग सर्वांची नजर बिरबलाकडे जाते. तो अगदी शांतपणे लोकांच्या हालचाली पाहत असतो. स्पर्श न करता बादशाहाने काढलेली रेषा मोठी करायचा मार्ग केवळ बिरबलाला ठाऊक असेल असे सगळ्याच दरबाराला वाटत असावे. अखेर कोणीच पुढे येत नाही हे पाहून बिरबल पुढे आले, त्यांनी बादशाहाने काढलेल्या रेषेपेक्षा छोटी रेघ ओढली आणि म्हणाले, ‘पाहा मी बादशाह अकबर यांनी काढलेली रेषा तिला स्पर्श न करता मोठी केली आहे’. त्यांच्या त्या धाडसाने, हुशारीने आणि हजरजबाबीपणामुळे बादशाह निरुत्तर झाला. बिरबलाची ही हुशारी, तीव्र बुद्धिमत्ता आणि सडेतोड भाष्य करण्याची क्षमता आज अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून आपल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. याच बिरबलाप्रमाणे सर्वसामान्य माणसाची बाजू घेत, गेली 50 वर्षे सत्ताधारी वर्गांसमोर आपल्या ‘रेषे’चे सामर्थ्य प्रकट करणारे आर.के. लक्ष्मण हे सुद्धा पुढील अनेक शतके लोकांच्या लक्षात राहतील यात अजिबात शंका नाही.

r k laxman life journeyव्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण यांनी फक्त ओळख किंवा प्रतिष्ठा नव्हे तर राजमान्यता आणि लोकमान्यताही मिळवून दिली होती. म्हणून त्यांच्या जाण्याने फक्त व्यंगचित्रकार किंवा या कलेचे नुकसान झाले नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणार्‍या सर्व समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. तसे पाहायला गेल्यास व्यंगचित्रकला आपल्याकडे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीमुळे आली. त्याच्याआधी आपल्याकडे लेखन, चित्रकला, स्थापत्य मूर्तिकला आदी कलांचा वारसा होता. मात्र व्यंगचित्रकला आम्हाला ब्रिटिशांमुळेच कळली आणि गेल्या शंभर-सव्वाशे वर्षे ती आपल्याकडे रुळली. खर्‍या अर्थाने म्हणायचे तर रुजली. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांसोबत व्यंगचित्रांचा भारतीय समाजात उगम झाला.

या व्यंगचित्रांचा सर्वसाधारण कल दृष्ट जातिप्रथा, रूढी अंधश्रद्धा आणि मानवी स्वभावाच्या चित्रणांवर भर असे. कारण ब्रिटिश राज्यकर्त्यांवर थेट टीका करणे कोणत्याच व्यंगचित्रकाराला शक्य नव्हते. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली पहिले सरकार दिल्लीत जेव्हा कार्यरत झाले तेव्हाही व्यंगचित्रकारांना थेट सरकारवर टीका करणे हे एवढे मोठे आव्हानात्मक काम होते, पण व्यंगचित्रकार शंकर यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या आणि धाडसाच्या बळावर भारतीय व्यंगचित्रकारांना महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. ‘शंकर्स वीकली‘ आणि ‘इंडियाज पंच’ या दोन व्यंगचित्राला वाहिलेल्या प्रकाशनामधून के.शंकर पिल्लई यांनी नव्याने सत्तेवर आलेल्या भारतीय लोकप्रतिनिधींना जरब बसवण्याची मोठी कामगिरी बजावली.

तत्कालीन समाजात व्यंगचित्र समजून घेण्यासाठी आवश्यक मानसिकता तयार करण्याची महत्त्वाची कामगिरी शंकर आणि त्यांच्याबरोबरीच्या व्यंगचित्रकारांनी केली होती. त्यानंतरच्या काळात हिंदू, फ्री प्रेस जर्नल आणि पुढे टाइम्स ऑफ इंडिया व्यंगचित्रकार म्हणून काम करणार्‍या आर.के. लक्ष्मण यांनी शंकर यांचा लोकहितकारी वारसा पुढे नेला होता. अर्धशतकाहून अधिक काळ व्यंगचित्राच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम करणारे लक्ष्मण यांच्यासारखे दुसरे उदाहरण सध्याच्या काळात पाहायला मिळत नाही. कारण आर.के. लक्ष्मण यांचे संपूर्ण जीवनच त्या कलेला वाहिलेले होते. त्यांचा दररोजचा दिनक्रम पाहिल्यावर आपल्याला त्यांची आपल्या कलेवर असलेली निष्ठा लक्षात येते. सकाळी बरोबर साडेआठ वाजता आपल्या काळ्या ऍम्बेसेडर कारमधून आर.के. लक्ष्मण टाइम्सच्या इमारतीत प्रवेश करायचे. कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कठीण दिवसांमध्ये सुद्धा त्यांचा हा दिनक्रम कायम असायचा.RK Laxman no more ज्यावेळेस वृतपत्राचं संपूर्ण कार्यालय शांत असायचं. अगदी ऑफिसमधील शिपाईदेखील आलेले नसत. तेव्हा आर.के. लक्ष्मण यांच्या केबिनमधील दिवे पेटलेले असायचे. वर्तमानपत्राचे ढीग नीट रचलेले असायचे. समोर ठेवलेल्या पेन्सिल आणि पॅडवरून विविध विषयांवरील व्यंगचित्रांचे कच्चे आराखडे झरझर तयार होत असायचे. सकाळी जेव्हा साडेदहाच्या सुमारास संपादक आणि सहसंपादकांची बैठक सुरू व्हायची तेव्हा साधारणत: आर.के. लक्ष्मण एखाद्या विलक्षण व्यंगचित्राला आकार देण्यास सज्ज झालेले असायचे.

सततचे वाचन मूक निरीक्षण आणि अफाट चिंतन या त्रिगुणाच्या माध्यमातून जेव्हा आर.के. लक्ष्मण व्यक्त होत तेव्हा त्यांच्या रेषांमधून सबंध जनतेचा आवाज प्रकट व्हायचा. त्या लोकभावनेची तमाम राज्यकर्त्यांना जरब होती. म्हणून फ्रॅकमोराई, एन.जे. नानपोरिया, श्यामलाल, गिरीलाल जैन यांच्यासारख्या दिग्गज संपादक मंडळींबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध राहिले. आर.के. लक्ष्मण यांच्यासोबत फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांचाही कुंचला लक्ष्मण यांच्या इतकाच तिखट आणि टोकदार होता. परंतु 80च्या दशकानंतर शिवसेनेसोबत बाळासाहेब ठाकरे यांचे कामही वाढत गेले. परिणामी लोकसंघटन, समाजकारण आणि राजकारणाच्या व्यापामुळे बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलेसाठी पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. त्याउलट आर.के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकला हे मिशन मानून काम केले आणि आपल्या रंगरेषाच्या फटकार्‍यांनी भारतीय समाजजीवन सजग आणि समृद्ध केले.

आर.के. लक्ष्मण यांची कला तीव्र निरीक्षणावर आधारित होती. त्याला त्यांनी सततचा अभ्यास आणि परिश्रमाची जोड दिली होती. बिहाईंड द टाइम्स या पुस्तकात त्यांच्या निरीक्षणशक्तीचा प्रत्यय देणारी एक सुंदर आठवण बची करकरिया यांनी लिहिली आहे. ‘एकदा दिलीप पाडगावकर आणि आर.के. लक्ष्मण महाराष्ट्रावरील एका पुस्तकाच्या कामानिमिताने ग्रामीण भागात फिरत होते. त्यावेळी आर.के. लक्ष्मण पाडगावकरांना सहज म्हणाले, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला दोन गोष्टी हमखास आढळतात. जेव्हा कधी मोठा माणूस लहान मुलाचा हात धरून रस्त्यावर चालतो त्यावेळी लहान मुलगा हा नेहमीच रस्त्याच्या बाजूला, जिथे वाहनाची वर्दळ असते तिथून चालताना दिसतो. त्यांच्या या वाक्याने आश्चर्यचकित झालेले दिलीप पाडगावकर थोड्याशा छदमीपणे म्हणाले, ‘ठीक आहे, या पुढे आपण पाहूया’. त्यानंतर त्यांना पुढे जे असे दहा लोक दिसले ज्यांनी आपल्या मुलांचा हात धरलेला होता आणि ते रस्त्यावर चालत होते. ते सारे जण मुलांना वाहनाच्या बाजूने चालत घेऊन जाताना दिसले. परिणामी पाडगावकर त्या विषयावर बोलू शकले नाहीत.

एकूणच काय तर आपल्या अवतीभोवती घडणार्‍या सर्व घटनांकडे लक्ष्मण डोळसपणाने पाहत होते. म्हणून त्यांच्या व्यंगचित्रातून सर्वसामान्य माणसाचा आवाज उठायचा. त्यांनी मोठ्या व्यंगचित्राबरोबरच ‘यू सेड इट’ या नावाने दैनिकांत काढलेली कार्टून्सची मालिका म्हणजे आपल्या समाजातील आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर केलेले महाभाष्य असायचे. सर्व संचारी ‘कॉमन मॅन’ला ओळख देण्याचा त्यांनी जोपर्यंत प्रयत्न केला त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातील सर्व विषयांची सार्वत्रिक चिकित्सा होत गेली. या पुढेही होत राहील. कारण समाजाच्या व्यंगावर बोट ठेवताना आर.के. लक्ष्मण यांनी केलेले भाष्य हे त्रिकालाबाधित सत्य होते. म्हणून असे कदाचित ‘द कॉमन मॅन ऍट लॉर्ज’ या आपल्या व्यंगचित्राच्या पुस्तकाची ओळख करून देताना आर.के. लक्ष्मण एका ठिकाणी म्हणतात, ‘मी अनेक वर्षांपासून व्यंगचित्र काढतोय. पण त्या व्यंगचित्रांमधील कोणत्याही काळाशी सुसंगत होण्याची क्षमता मला नेहमी आश्चर्यचकित करते.’

@MaheshMhatre

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close