बंदुकीचा धाक दाखवून महिलेचं अपहरण आणि मारहाण

January 27, 2015 8:50 PM0 commentsViews:

parbhani34527 जानेवारी : पोलीस केस मागे घेण्याच्या कारणावरून परभणीच्या सेलूतील व्यापार्‍याने महिलेचे बंदुकीच्या धाकात अपहरण करून तिला 2 दिवस डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना घडलीये. एका कामगाराच्या मदतीने सदर महिलेने तिथून कशीबशी आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी व्यापार्‍याविरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप व्यापारी पसार आहे.

वर्ष भरापूर्वी कर्ज मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा सेलुतील एसबीएच बँकेच्या व्यवस्थापकाकडून विनयभंग करण्यात आल्याने पीडित महिलेने सेलू पोलीस ठाण्यात मनजित माही या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा परत घे असे म्हणत सेलुतील व्यापारी सुरेंद्र तोष्णीवाल यांनी 3 दिवसांपूर्वी या महिलेला सेलुतून बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करून वालूर येथील गोदामात 2 दिवस डांबून ठेवले व गुन्हा मागे घेण्यासाठी बेदम मारहाण केली. परंतु पीडित महिलेनं नकार दिला. त्याचवेळी तेथे काम करत असलेल्या मिस्त्री कामगाराने या महिलेला पाहिल्यानंतर त्यांची सुटका केली व थेट पोलीस ठाणे गाठले. परंतु या 2 दिवसांत बेदम मारहाण केल्याने भेदरलेल्या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पोलिसांनी व्यापारी सुरेंद्र तोष्णीवाल अन्य 3 जणांविरोधात बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करत मारहाण केल्याचा गुन्हा सेलू पोलीस ठाण्यात दाखल केला आहे परंतु या व्यापार्‍याला अद्याप अटक करण्यात आली नाही. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close