‘मन की बात’मध्ये झाला ‘बराक’ यांच्या नावाचा उलगडा

January 27, 2015 10:01 PM0 commentsViews:

 obama man ki baat27 जानेवारी :अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे रेडिओवरून भारतीयांशी दिलखुलास संवाद साधला. ‘मन की बात -ओबामा साथ साथ’ हा कार्यक्रम अगोदरच रेकॉर्ड करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी लोकांकडून प्रश्न मागवण्यात आले होते. ओबामा आणि मोदींनी या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली. दोन्ही नेत्यांनी आपले कडू-गोड अनुभव सांगितले. तसंच या कार्यक्रमात ‘बराक’ या शब्दाचा अर्थही मोदींनी समजावून सांगितला.

‘मन की बात’ या कार्यक्रमात बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी मुक्त संवाद साधला. भारतीय रेडिओच्या इतिहासात पहिल्यांदाच जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्राच्या अध्यक्षांचा आवाज घुमला. मोदींनी याअगोदर तीन वेळा देशवासीयांशी संवाद साधलाय. पण या वेळेस पंतप्रधान एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बराक ओबामा यांच्या नावाचा अर्थ समजून सांगितला. बराक या नावाचा अर्थ ‘ज्यांना आशीर्वाद मिळालेला आहे’ असा होतो. तर ओबामांनी आपल्या भाषणाची सुरूवात ‘नमस्ते’नं केली. भारतीयांशी थेट रेडिओवरून थेट संवाद साधणे हे खरंच महत्वपूर्ण आहे. यामुळे दोन्ही देशादरम्यान संबंध आणखी मजबूत होण्यास प्रेरणा मिळालीये.

त्यानंतर मोदींनी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडत श्रोत्यांची प्रश्न ओबामांना विचारली. ‘भारत दौर्‍याबद्दल आपल्या मुलींना काय सांगणार ?’ असा प्रश्न एका श्रोत्यांने विचारला. यावर ओबामा म्हणाले, ‘माझ्या दोन्ही मुली भारतात येऊ इच्छित होत्या पण त्यांची परीक्षा असल्यामुळे येऊ शकल्या नाहीत. पण त्यांना भारताबद्दल खूप आस्था होती. मी त्यांना सांगणार आहे की, त्याचा विचार खरा होता. पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा त्यांना सोबत घेऊन येईन.’

मोदी पंतप्रधान होण्याअगोदर अमेरिकेला गेले असता व्हाईट व्हाऊस बाहेर उभं राहुन फोटो काढला होता. याबद्दल एका श्रोत्यांने मोदींना त्याबद्दलचा अनुभव विचारला. यावर मोदी म्हणाले, ‘ओबामांनी मला 1894 मध्ये स्वामी विवेकानंद यांचं एक पुस्तक भेट दिलं होतं. पण त्यावेळी असा विचार केला नव्हता की, ओबामा भारत भेटीवर येतील आणि आज अशी भेट होईल. पण, कधीही काहीही बनण्याची स्वप्न पाहू नका, काही करून दाखवण्याचं स्वप्न पाहा. मी आयुष्यात मोठा व्यक्ती बनण्याचं स्वप्न पाहिलं नाही.’

अमेरिकेत तुम्हाला कोणती व्यक्ती आवडते ? असा प्रश्न एका श्रोत्याने मोदींना विचारला. यावर मोदींनी उत्तर दिलं. ‘मी, बेंजामिन फ्रॅकलिन यांचं आत्मचरित्र वाचलंय. त्याच्यामुळे प्रभावित झालोय. बेंजामिन हे एका सामान्य कुटुंबातून होते, पण त्यांनी अमेरिकेवर आपला ठसा उमटवलाय.’

आपण अडचणीत असताना आपल्या प्रसन्नतेचं रहस्य काय ? असा प्रश्न ओबामांना विचारला असता, ओबामा म्हणाले, ‘काही अडचणी माझ्याकडे येतात, पण मला माहित आहे की, त्यावर तोडगा माझ्याकडेच आहे. दुसर्‍यांना मदत करण्यात खरं समाधान दडलंय.’

कार्यक्रमाच्या शेवटला मोदींनी ओबामांचे आभार मानले. मन की बात का कार्यक्रमाचं ई बुक तयार करण्यात यावी आणि त्यासाठी जनतेनं आपला सल्ला सुचवावा असं आवाहनही मोदींनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close