धक्कादायक, मुंबईत नायजेरियन ड्रग्स माफियांचं बस्तान !

January 28, 2015 4:52 PM0 commentsViews:

राहुल झोरी, मुंबई

28 जानेवारी : मुंबईमध्ये अलिकडेच ‘एम डी’ नावाच्या ड्रगनं लाखो तरुणांना आपल्या नादाला लावलं. मात्र मुंबईमध्ये होणारा अंमली पदार्थांचा धंदा अजिबातच नवा नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईत राहणार्‍या नायजेरियन आणि इतर आफ्रिकन देशातल्या नागरिकांची अंमली पदार्थांच्या या धंद्यात चलती आहे. यातले अनेकजण आता मुंबईतच स्थायिक झालेत. मुंबई पोलिसांसमोरचं हे मोठं आव्हान आहे.

nigerian drug dealersमुंबईचं नाइटलाइफ म्हटलं की, ड्रग्सचा विषय येणारच. कधी न झोपणार्‍या या महानगराच्या पोटात दडलंय एक भीतिदायक वास्तव. कारण इथे वाढत असलेली अंमली पदार्थांची मागणी सध्या पोलिसांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे. अंमली पदार्थांची तस्करी करताना ज्या थक्क करणार्‍या युक्त्या वापरल्या जात आहेत, त्यामुळे पोलिसांच्या कारवाई करताना नाकी नऊ आले आहेत. अंमली पदार्थांच्या या नशिल्या धंद्यात गेल्या अनेक वर्षांपासून जम बसवलाय तो आफ्रिकन देशांतून आलेल्या अडदांड अंगकाठीच्या लोकांनी. विशेषतः नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त ड्रग पेडलर्स एकट्या नायजेरिया या दरिद्री देशातून आलेले आहेत. मुंबई पोलिसांनी गेल्या 2 वर्षांत केलेल्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत दीडशे पेक्षा जास्त नायजेरिन लोकांना ड्रग्सची तस्करी करताना अटक केलीय.

मात्र अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या या नायजेरियन्सना मुंबई पोलिसांची फारशी भीती नसते, असंच दिसतंय. पोलीस मागे लागले, तर पळ काढण्यात ते सराईत आहेत. पकडले गेलेच, तर गयावया करत म्हणतात, ‘कारवाई करा, पण आमच्या देशात परत पाठवू नका’ एकदा गुन्हा दाखल झाला की त्यांना भारतात राहून अंमली पदार्थ विकण्याची जणू पावतीच मिळते .

मुंबईला ड्रग्सचा विळखा
– ते कॉलेज कॅम्पस, पब्स, उच्चभ्रू वसाहतीच्या ठिकाणी ड्रग्सची विक्री करतात
– तस्करीच्या विरोधात नार्कोटिक्स विभाग कारवाई करतो
– IPC अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला, तर त्याला परदेशात पाठवता येत नाही
– गुन्हा दाखल होणं म्हणजेच भारतात राहण्याची झालेली अधिकृत सोय
– अंमली पदार्थांच्या विरोधात असलेल्या दुबळ्या कायद्यांचा नायजेरियन तस्कर फायदा घेतात
– काही महिन्यांतच जामिनावर सुटका झाली की पुन्हा जोमानं ड्रग्सची विक्री सुरू होते

मुंबईत अंमली पदार्थांच्या या धंद्यात वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मुंबईच्या अँटी नार्कोटिक्स विभागाने गेल्या 3 वर्षांत केलेल्या कारवाईत नायजेरियन नागरिकांकडून आतापर्यंत 20 कोटींपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तर दीडशेपेक्षा जास्त नायजेरिन्सवर अटक करुन कारवाई सुरू केलीये. पण कडक कायदे नसल्यामुळे आणि आहेत त्यांची नीट अंमलबजावणी होत नसल्यामुळे हे नायजेरियन घुसखोर राजरोसपणे मुंबईमध्ये अवैध धंदे सुरू ठेवतात.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close