सुजाता सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा, एस. जयशंकर नवे परराष्ट्र सचिव

January 29, 2015 10:14 AM0 commentsViews:

jaishankar_clean_4

29 जानेवारी : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍यानंतर परराष्ट्र मंत्रालयात मोठा फरबदल झाला आहे. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारताचे अमेरिकेतील राजदूत एस. जयशंकर यांनी परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुजाता सिंह यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. सुजाता सिंह यांचा परराष्ट्र सचिवपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या जुलैमध्ये संपणार होता. मात्र, त्यापूर्वीच अशाप्रकारे तडकाफडकी त्यांना  त्यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍यावर गेल्यानंतर जयशंकर यांचे काम पाहून मोदी चांगलेचं खुश झाले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच झालेल्या यशस्वी भारत दौर्‍यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच त्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध यशस्वीरित्या हाताळले होते. या कारणांमुळेच जयशंकर यांना परराष्ट्र सचिवपदाची संधी मिळल्याचे सांगण्यात येत आहे. जयशंकर यांनी यापूर्वी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. जयशंकर हे 1977 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत.

जयशंकर यांची नियुक्ती झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून जयशंकर यांचे अभिनंदन केले आहे. जयशंकर यांना परराष्ट्र सचिव करून केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे. ते एक चांगले परराष्ट्र सचिव बनू शकतील, असे अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close